विनोद पवार (जळगाव प्रतिनिधी) : महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष व शिवसेना (शिंदे गट) यांच्या महायुतीने घवघवीत यश मिळवत सत्ता आपल्याच हाती कायम राखली आहे. एकूण ७५ जागांपैकी तब्बल ६९ जागांवर महायुतीच्या उमेदवारांनी विजय मिळवल्याने महापौर व उपमहापौर निवडीत कोणताही अडथळा राहिलेला नाही. त्यामुळे दोन्ही पदांची निवड बिनविरोध होणे जवळपास निश्चित झाली आहे.
भाजपने सर्वाधिक ४६ जागा जिंकत महानगरपालिकेत स्पष्ट बहुमत सिद्ध केले असून, मित्र पक्ष शिवसेना शिंदे गटाने २३ जागा मिळवत दुसरा क्रमांक मिळवला आहे. या भक्कम संख्याबळामुळे महापौर व उपमहापौरपदावर महायुतीचे नेतृत्व एकमताने ठरले आहे.
महापौरपद ओबीसी महिला प्रवर्गासाठी आरक्षित असल्याने भाजपच्या दीपमाला मनोज काळे यांची महापौरपदी बिनविरोध निवड होणार असल्याचे स्पष्ट संकेत आहेत. तर उपमहापौरपद शिवसेना शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतला असून, मनोज सुरेश चौधरी यांना उपमहापौरपदाची जबाबदारी दिली जाणार आहे.
दोन्ही पदांसाठी आवश्यक अर्ज दाखल करण्यात आले असून, येत्या ६ तारखेला निवडीची औपचारिक घोषणा करण्यात येणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला महापौर-उपमहापौर निवडीचा प्रश्न अखेर निकाली निघाल्याने भाजप व शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. शहराच्या विकासासाठी समन्वयाने काम करण्याचा निर्धारही यानिमित्ताने व्यक्त करण्यात येत आहे.






















