Times Of Maharashtra Desk : बीड जिल्ह्याच्या विकासाचे वर्षानुवर्षे अपूर्ण राहिलेले स्वप्न साकार करण्याची ही निर्णायक वेळ असून, त्यासाठी सर्व राजकीय मतभेद बाजूला ठेवून एकजुटीने काम करण्याची गरज आहे, असे भावनिक आवाहन माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी केले. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली खंबीरपणे उभे राहून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी योगदान देऊ, अशी ठाम भूमिका त्यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मांडली.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज बीड जिल्हा नियोजन समितीची पहिली बैठक पार पडली. स्वर्गीय अजित पवार यांच्या निधनानंतर ही पहिलीच बैठक असल्याने संपूर्ण सभागृहात भावनिक वातावरण होते. बैठकीच्या सुरुवातीला धनंजय मुंडे यांनी स्व.अजित पवार यांच्या निधनाबद्दल शोक प्रस्ताव मांडला.
यावेळी बोलताना मुंडे म्हणाले, अजितदादा हे केवळ राजकीय नेते नव्हते, तर मला कायम वडिलकीचा आधार देणारे व्यक्तिमत्त्व होते. आमचं नातं अतिशय आपुलकीचं होतं. त्यांच्या अकाली जाण्याने माझं वैयक्तिक नुकसान झालंच आहे, पण बीड जिल्ह्याच्या विकासालाही मोठा धक्का बसला आहे.
अजित पवार यांनी अल्प काळात बीड जिल्ह्याच्या विकासासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतल्याचे सांगत मुंडे यांनी काही योजनांचा विशेष उल्लेख केला. संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजनेअंतर्गत बीड जिल्ह्यात 11 वसतिगृहांच्या उभारणीसाठी 159 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. “या कामासाठी अजितदादांनी स्वतः मला शब्द दिला होता,” अशी आठवण सांगताना मुंडे भावुक झाले.
दरम्यान, स्व. अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर त्यांच्या जागी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली असून, अजित पवार पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यांची जबाबदारीही त्यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची ही पहिलीच बैठक असल्याने या बैठकीला विशेष राजकीय व प्रशासकीय महत्त्व प्राप्त झाले.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मुंबईहून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीत सहभागी झाल्या. त्यांनी बीड आणि पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठका घेत विकासकामांना गती देण्याचे स्पष्ट संकेत दिले.
बीड जिल्ह्याच्या विकासासाठी आता सर्वांनी एकत्र येऊन काम करावे, हा संदेश या बैठकीतून ठळकपणे पुढे आला असून, आगामी काळात जिल्ह्यातील विकास प्रक्रियेला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.





















