संघराज गायकवाड,राहुल आढाव (दौंड प्रतिनिधी) : दौंड येथे महान समाजसुधारक, स्वच्छतेचे प्रणेते व अंधश्रद्धा निर्मूलनाचे पुरस्कर्ते संत गाडगे बाबा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमास नगरपरिषदेचे सर्व नगरसेवक व नगरसेविका, मुख्याधिकारी तसेच शहरातील विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. संत गाडगे बाबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यात आले.
स्वच्छता, शिक्षण व मानवसेवेचा संदेश देत संत गाडगे बाबांनी आयुष्यभर समाजजागृतीचे कार्य केले. त्यांच्या विचारांची आजच्या समाजाला नितांत गरज असल्याचे मत यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
यावेळी सकल परीट समाजातर्फे दौंड शहरात संत गाडगे बाबा यांचे स्मारक उभारण्यात यावे, अशी मागणी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा, उपनगराध्यक्षा तसेच उपस्थित सर्व नगरसेवकांकडे करण्यात आली. या मागणीवर सकारात्मक विचार करून पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन यावेळी देण्यात आले.






















