दौंड (प्रतिनिधी मयूर साळवे) : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) महिला आघाडीच्या दौंड शहर अध्यक्षपदी सौ. आरोहीताई संदिपान वाघमोडे यांची निवड करण्यात आली आहे. ही नियुक्ती खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात आली असून, पक्षात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या नियुक्तीचे पत्र राष्ट्रवादी महिला काँग्रेस पुणे जिल्हा अध्यक्ष सौ. भारती युवराज शेवाळे यांच्या स्वाक्षरीने देण्यात आले आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार तसेच महिला आघाडीच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली ही निवड करण्यात आली आहे.
सौ. आरोहीताई वाघमोडे या गेल्या काही वर्षांपासून सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय असून, महिला संघटन मजबूत करण्यासाठी त्यांनी विशेष कार्य केले आहे. त्यांच्या निवडीमुळे दौंड शहरात महिला आघाडी अधिक बळकट होईल, असा विश्वास पक्ष पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
नियुक्तीनंतर बोलताना त्यांनी पक्षाने दिलेल्या जबाबदारीचे प्रामाणिकपणे पालन करत महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याचे सांगितले. तसेच पक्षाच्या विचारधारेचा प्रसार करून अधिकाधिक महिलांना संघटनेशी जोडण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत असून, पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.






















