Times Of Maharashtra Desk : पुण्यातील कोंढवा परिसरात एका नामांकित बिल्डरची फसवणूक करून, फ्लॅटचे पूर्ण पैसे न देताच बेकायदेशीरपणे ताबा मिळवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी प्रकाश रामचंद्र जैन (वय ५२, रा. बिबवेवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रविण मंचलाल ओसवाल आणि भारती प्रविण ओसवाल यांच्या विरोधात कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
फिर्यादी प्रकाश जैन यांचा बांधकाम व्यवसाय असून, त्यांनी कोंढवा येथील ‘मंडोत टॉवर्स’ (मंडोत प्रॉपर्टीज) मध्ये फ्लॅट विक्रीचा व्यवहार केला होता. प्रविण ओसवाल यांच्याशी त्यांचे जुने ओळखीचे संबंध असल्याने, ओसवाल यांनी २०११ मध्ये १० व्या मजल्यावरील १०३३ क्रमांकाचा फ्लॅट घेण्याचे ठरवले होते.
व्यवहाराची अट फ्लॅटची एकूण किंमत ७० लाख रुपये ठरली होती. त्यापैकी सुरुवातीला २० लाख १० हजार रुपये देण्यात आले होते. उर्वरित ४९ लाख ९० हजार रुपये ७ महिन्यांच्या आत देणे बंधनकारक होते.
अटींचे उल्लंघन जर ७ महिन्यांत व्यवहार पूर्ण झाला नाही, तर १० टक्के रक्कम कापून घेऊन व्यवहार रद्द केला जाईल, असे करारनाम्यात स्पष्ट नमूद होते. मात्र, ओसवाल यांनी वारंवार सांगूनही उर्वरित रक्कम दिली नाही.






















