गेवराई:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड) वैतागवाडी व सफेपुर येथे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांचा दौरा ; वरिष्ठांचे नागरिकांना आवाहन
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या विशेष गहन पुनरीक्षण ( एस . आय . आर . ) मोहिमेला बीड तालुक्यात अधिक गती देण्यात आली असून , तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी आज सात्रा , वैतागवाडी व सफेपुर येथे भेट देत विशेष शिबिरांची पाहणी केली . यावेळी नागरिकांशी संवाद साधून गणना पत्र भरणे , आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे , तसेच अनॉमली ( विसंगती ) प्रकरणांची तातडीने दुरुस्ती करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले .

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी विवेक जॉन्सन यांनी सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की , विशेष गहन पुनरीक्षण मोहिमेत सक्रिय सहभाग घेऊन आपले गणना पत्र तातडीने भरावे , आवश्यक कागदपत्रे सादर करावीत आणि मतदार यादीतील कोणतीही विसंगती असल्यास ती त्वरित दूर करून घ्यावी . अचूक , अद्ययावत आणि त्रुटीमुक्त मतदार यादी तयार करण्यासाठी नागरिकांचे सहकार्य अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले .
विशेष शिबिरांमध्ये मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहून गणना पत्रे भरून देत आहेत . गावागावांत बूथस्तरीय अधिकारी , ग्रामसेवक , महसूल कर्मचारी व स्थानिक प्रशासन यांच्या समन्वयातून मोहिमेला वेग आला असून , नागरिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे . तहसीलदार शेळके यांनी प्रत्येक केंद्रावर प्रत्यक्ष पाहणी करून अधिकारी व कर्मचाऱ्यांना शिल्लक राहिलेल्या प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याच्या सूचना दिल्या .
बीड तालुक्याच्या १७ जुलै २०२६ च्या अहवालानुसार ४ , ३६ , ५६७ मतदारांपैकी ३ , ४८ , २५४ गणना पत्रांचे वाटप पूर्ण झाले असून , त्याचे प्रमाण ७९ . ७७ टक्के इतके आहे . तसेच १ , ८८ , ०४३ गणना पत्रांचे डिजिटायझेशन पूर्ण झाले असून , त्याचे प्रमाण ४३ . ०७ टक्के आहे . बीड तालुक्याचे एकूण काम ६१ . ४२ टक्के पूर्ण झाले असून , उर्वरित काम वेगाने पूर्ण करण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे .
अनॉमली ( विसंगती ) दुरुस्तीवर विशेष भर – तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी शिबिरांमध्ये अनॉमली अर्थात विसंगती प्रकरणांची विशेष तपासणी करण्याच्या सूचना दिल्या . मतदार यादीतील नाव , लिंग , वय , नातेसंबंध , आई – वडिलांचे नाव , पती – पत्नीचे तपशील , एकाच व्यक्तीची एकापेक्षा अधिक नोंद , पालक व मुलांच्या वयातील विसंगती , चुकीचा पत्ता , मृत व्यक्तीची नोंद , तसेच पूर्वीच्या मतदार यादीशी जुळत नसलेली माहिती अशा सर्व त्रुटी तातडीने दूर करण्याचे निर्देश देण्यात आले . प्रत्येक अनॉमलीची प्रत्यक्ष पडताळणी करून आवश्यक पुरावे घेणे , ग्राह्य कागदपत्रांच्या आधारे माहितीची खातरजमा करणे आणि त्यानंतरच अंतिम नोंद करणे , अशा स्पष्ट सूचना सर्व बूथस्तरीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या . कोणतीही विसंगती प्रलंबित ठेवू नये , असेही निर्देश देण्यात आले .
घराघरात जाऊन संपर्क वाढविण्याच्या सूचना – ज्या मतदारांनी अद्याप गणना पत्र भरलेले नाही , अशा प्रत्येक मतदाराच्या घरी जाऊन संपर्क साधावा . नागरिकांच्या शंकांचे तातडीने निरसन करावे . कोणताही पात्र मतदार वंचित राहू नये , यासाठी विशेष प्रयत्न करावेत . वृद्ध , दिव्यांग , गंभीर आजारी तसेच बाहेरगावी असलेल्या मतदारांपर्यंतही प्रशासनाने पोहोचून त्यांची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी , अशा सूचना यावेळी देण्यात आल्या .
उपविभागीय अधिकारी कविता जाधव यांनी सर्व बूथस्तरीय अधिकारी , महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उर्वरित प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचून गणना पत्र भरून घ्यावे . तसेच अनॉमलीची कोणतीही प्रकरणे प्रलंबित न ठेवता त्यांचे तातडीने निराकरण करावे , अशा सूचना दिल्या .
तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी नागरिकांना आवाहन केले की , ” मतदार यादी ही लोकशाहीचा पाया आहे . प्रत्येक पात्र मतदाराची माहिती अचूक असणे अत्यंत आवश्यक आहे . त्यामुळे प्रत्येक नागरिकाने आपले गणना पत्र भरून द्यावे , आवश्यक कागदपत्रे जोडावीत आणि अनॉमली असल्यास ती त्वरित दूर करून घ्यावी . कोणताही पात्र मतदार मतदार यादीबाहेर राहणार नाही , यासाठी प्रशासन कटिबद्ध असून नागरिकांनीही या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा . ”
प्रशासनाच्या प्रभावी नियोजनामुळे बीड तालुक्यातील विशेष गहन पुनरीक्षण मोहिमेला दिवसेंदिवस गती मिळत असून , गणना पत्र वाटप , डिजिटायझेशन आणि अनॉमली दुरुस्ती शंभर टक्के पूर्ण करण्यासाठी महसूल व निवडणूक यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत आहे . आगामी काही दिवसांत उर्वरित प्रत्येक पात्र मतदारापर्यंत पोहोचून त्रुटीमुक्त , अचूक आणि सर्वसमावेशक मतदार यादी तयार करण्याचा प्रशासनाचा निर्धार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले .






















