सिन्नर:( प्रतिनिधी नवनाथ आव्हाड ) महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आमदार मा. माणिकराव कोकाटे यांच्या संकल्पनेतून कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार (दि. 23 जुलै) रोजी वावी येथील महात्मा ज्योतिबा फुले सभागृहात शेतकरी–शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रम उत्साहात पार पडला.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने, प्रकल्प संचालक (आत्मा) अभिमन्यू काशिद, उपविभागीय कृषी अधिकारी भटू पाटील, तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर नाठे तसेच मंडळ कृषी अधिकारी ज्ञानेश्वर दुरगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिन्नरचे नगराध्यक्ष विठ्ठलराजे उगले होते. यावेळी राजेंद्र चव्हाणके, रामनाथ कर्पे, कन्हैयालाल भुतडा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
मार्गदर्शन सत्रात कांदा व द्राक्ष संशोधन केंद्र, पिंपळगाव बसवंत येथील डॉ. राकेश सोनवणे, गहू संशोधन केंद्र, निफाड येथील वरिष्ठ संशोधन सहाय्यक डॉ. भरत मालुंजकर तसेच सह्याद्री शेतकरी उत्पादक कंपनी, मोहाडीचे मंगेश भास्कर यांनी आधुनिक शेती, पीक व्यवस्थापन, बाजारपेठेतील संधी आणि कृषी क्षेत्रातील नवतंत्रज्ञान याविषयी शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी शेतकऱ्यांनी विविध विषयांवरील शंका उपस्थित करून तज्ज्ञांकडून समाधानकारक उत्तरे मिळवली.
कार्यक्रमात प्रगतिशील शेतकऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाचा ‘शेतीनिष्ठ पुरस्कार’ प्राप्त शेतकरी राम सुरसे यांचा विशेष गौरव करण्यात आला.
यावेळी कृषी विभागातील सहाय्यक कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी तसेच मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर नाठे यांनी केले. तर तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक गोकुळ जाधव यांनी आत्मा अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना आणि शेतकरी गटांविषयी माहिती दिली. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवर, मार्गदर्शक आणि शेतकरी बांधवांचे कृषी विभागाच्या वतीने आभार मानण्यात आले.






















