सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) सिन्नर एमआयडीसी प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या विकासकामांच्या दर्जा व गुणवत्तेबाबत उद्योजकांमध्ये पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काही दिवसांपूर्वी मोठ्या थाटामाटात एल अँड टी फाटा आणि जिंदाल फाटा येथे एमआयडीसीचे दिशादर्शक फलक उभारण्यात आले होते. मात्र अवघ्या काही दिवसांतच यापैकी एक फलक फाउंडेशनसह वाऱ्यामुळे उखडून कोसळल्याची घटना घडली.
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, ही घटना भरदिवसा किंवा वाहतुकीच्या वेळी घडली असती तर मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे फलक उभारणीच्या कामाचा दर्जा, वापरण्यात आलेले साहित्य आणि कामाच्या अंमलबजावणीवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

उद्योजकांनी या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच या निकृष्ट कामामुळे झालेल्या आर्थिक नुकसानीची जबाबदारी निश्चित करावी, अशीही मागणी होत आहे.
याशिवाय, एमआयडीसी परिसरातील रस्त्यांच्या डागडुजीच्या कामाबाबतही उद्योजकांनी नाराजी व्यक्त केली आहे. रस्त्याची दुरुस्ती होऊन अवघा एक महिनाही उलटलेला नसताना रस्ता पुन्हा पूर्ववत खराब अवस्थेत आल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सार्वजनिक निधीचा अपव्यय होत असल्याची भावना उद्योजकांमध्ये व्यक्त होत असून, संबंधित कामांची स्वतंत्र तांत्रिक चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.






















