दौंड (प्रतिनिधी-मयुर साळवे संघराज गायकवाड) दिल्ली येथील जंतर-मंतरवर विद्यार्थी शांततेत आंदोलन करीत असताना पोलिस प्रशासनामार्फत विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या कथित अमानुष हल्ल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा श्रद्धेय ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. या आवाहनाला प्रतिसाद देत आज दौंड शहर व तालुक्यात विविध पक्ष आणि समविचारी संघटनांच्या वतीने बंद आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात वंचित बहुजन आघाडी दौंड शहर व तालुका, भारतीय बौद्ध महासभा, ऑल इंडिया पँथर सेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर गट), राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), भारतीय काँग्रेस पक्ष, राष्ट्रीय दलित पँथर तसेच सर्व समविचारी पक्ष व संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले.
यावेळी दिल्लीतील विद्यार्थी आंदोलकांवरील कारवाईचा तीव्र निषेध नोंदवत विद्यार्थ्यांना न्याय मिळावा आणि संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. आंदोलनादरम्यान NEET पेपरफुटीची निष्पक्ष चौकशी, विद्यार्थ्यांना त्वरित न्याय आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या मागण्याही करण्यात आल्या.
हे बंद आंदोलन यशस्वी करण्यासाठी सहभागी झालेल्या सर्व पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच समविचारी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आयोजकांच्या वतीने आभार मानण्यात आले.






















