शिरपूर, धुळे:(प्रतिनिधी तुषार शेटे) किसान विद्या प्रसारक संस्था संचलित कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर सी.बी.एस.ई स्कूल, शिरपूर येथे भारतरत्न, माजी राष्ट्रपती तथा ‘मिसाईल मॅन’ म्हणून जगभर प्रसिद्ध असलेल्या डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादनपर कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. शाळेच्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमास विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर प्राथमिक विभागातील कुमार कल्पित कमलेश ढोले तसेच माध्यमिक विभागातील कुमार रामेश्वर एकनाथ दहिफळे यांनी डॉ. कलाम यांच्या प्रेरणादायी जीवनकार्य, वैज्ञानिक योगदान, राष्ट्रसेवा आणि युवकांसाठी दिलेल्या संदेशांवर प्रभावी भाषणे सादर केली. विद्यार्थ्यांच्या ओजस्वी वक्तृत्वाला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शाळेच्या प्राचार्या सौ. सुरेखा मिस्त्री, तसेच शाळेचे समन्वयक श्री. सागर वाघ आणि शाळेचे उप प्राचार्य श्री. विवेक पाटील उपस्थित होते. आपल्या मनोगतात उप प्राचार्य विवेक पाटील यांनी, “डॉ. कलाम यांचे जीवन हे प्रत्येक विद्यार्थ्यासाठी प्रेरणादायी आहे. मोठी स्वप्ने पाहून ती पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम, शिस्त आणि ज्ञानाची कास धरणे आवश्यक आहे,” असे प्रतिपादन केले.

यानंतर शाळेच्या ऑडिटोरियम हॉलमध्ये डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनचरित्रावर आधारित प्रेरणादायी माहितीपट विद्यार्थ्यांना दाखविण्यात आला. या माहितीपटाच्या प्रदर्शनाची व्यवस्था श्री. नितीन पाटील यांनी केली. माहितीपटामुळे विद्यार्थ्यांना डॉ. कलाम यांच्या संघर्षमय जीवनप्रवासाची, वैज्ञानिक संशोधनाची आणि राष्ट्रनिर्मितीतील अमूल्य योगदानाची सखोल माहिती मिळाली.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन कुमारी स्वरा राजू पाटील व कुमारी राजनंदिनी बडगुजर यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन व समन्वय श्री. नितीन पाटील व शमीम मन्सुरी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या विचारांचा आदर्श घेऊन राष्ट्रप्रेम, वैज्ञानिक दृष्टिकोन, प्रामाणिकपणा आणि परिश्रम यांच्या बळावर जीवनात यश संपादन करण्याची प्रेरणा मिळाली.






















