झिंगानूर (प्रतिनिधी जाबिर खान):झिंगानूर येथील वीर बाबुराव शेडमाके चौकात ९ ऑगस्ट २०२६ रोजी जागतिक आदिवासी दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सरपंच सौ. नीलिमा ताई मडावी यांनी भूषविले. आदिवासी समाजाची समृद्ध संस्कृती, परंपरा आणि सामाजिक एकतेचा जागर यावेळी करण्यात आला.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस स्टेशन झिंगानूरचे प्रभारी अधिकारी मा. खोपडे साहेब उपस्थित होते. तसेच शंकर मडावी सर, गिरी साहेब (PSI), माडिक साहेब (PSI), माजी सरपंच कारेजी मडावी आणि बोडकाची गावडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी आदिवासी समाजाच्या पारंपरिक संस्कृतीचे महत्त्व अधोरेखित केले. जल, जंगल आणि जमीन हे आदिवासी समाजाच्या जीवनाशी जोडलेले मूलभूत घटक असून, त्यांचे संवर्धन करण्याची गरज असल्याचे मार्गदर्शन करण्यात आले. बदलत्या काळात शिक्षणाला महत्त्व देत सामाजिक आणि शैक्षणिक प्रगती साधण्याचे आवाहनही करण्यात आले.
आदिवासी समाजाने आपल्या समृद्ध परंपरा आणि सांस्कृतिक वारशाचे जतन करत आधुनिक शिक्षणाच्या माध्यमातून पुढे जावे, असा संदेश कार्यक्रमातून देण्यात आला. यावेळी विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला ग्रामस्थ, युवक, महिला तसेच आदिवासी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. एकता, संस्कृतीचा अभिमान आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देत कार्यक्रम उत्साहात पार पडला.
“जल, जंगल, जमीन आणि संस्कृतीचे रक्षण करूया; शिक्षणाच्या माध्यमातून समाजाची प्रगती साधूया!” हा संदेश यावेळी देण्यात आला.























