सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) :सिन्नर येथे सह्याद्री युवा मंच आणि सिन्नर तालुका शालेय क्रीडा आयोजन समितीच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. १४, १७ आणि १९ वर्षांखालील मुली तसेच १७ आणि १९ वर्षांखालील मुलांच्या ग्रीको रोमन कुस्ती स्पर्धेला खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तालुक्यातील सुमारे २५ शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला.
स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी जिल्ह्याचे युवा नेते उदयभाऊ सांगळे, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शीतलताई सांगळे, नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव एस. बी. देशमुख, भीमराव चव्हाण, दीपक सुडके, राजू पोमनर, अवधूत आव्हाड यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उदयभाऊ सांगळे यांनी सिन्नर तालुक्यातील खेळाडूंना वर्षभर विविध क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. प्रमुख अतिथींच्या हस्ते राज्य व राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा सन्मान करण्यात आला.
स्पर्धेत फ्रीस्टाइल कुस्ती प्रकारात तब्बल ६२ मुलींनी, तर ग्रीको रोमन कुस्ती प्रकारात २५ खेळाडूंनी सहभाग घेतला. विविध वजनगटांमध्ये परी जगदीश झाडे, अनिल कातकडे, प्रगती योगेश क्षत्रिय, ईश्वरी राजेंद्र खताळे, वैष्णवी हेमंत सोनवणे, जीविका भगवान कांदळकर, संध्या वाजे आणि आरोही पल्लवी आव्हाड यांच्यासह अनेक खेळाडूंनी आपले कौशल्य दाखविले.
स्पर्धेच्या तांत्रिक बाबी तालीम संघाचे मुख्य प्रशिक्षक व एन.आय.एस. क्रीडा मार्गदर्शक बाळूभाऊ बिन्नर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडल्या. तालुका क्रीडा संयोजक प्रा. पी. एम. खैरनार, आयोजन समितीचे अध्यक्ष किरण मिठे, रामनाथ जाधव, एस. टी. गुरुळे, सुनील शिंदे, भालेराव सर यांच्यासह तालुक्यातील क्रीडा शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण मिठे यांनी केले, तर रामनाथ जाधव यांनी आभार मानले.






















