ब्रम्हपुरी :(प्रतिनिधी रुपेश देशमुख) ग्रामीण भागातील नागरिकांना विविध शासकीय, निमशासकीय आणि खाजगी सेवा गावपातळीवरच उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाच्या ‘आपले सरकार सेवा केंद्र’ उपक्रमांतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायत स्तरांवर रिक्त असलेल्या सेवा केंद्रांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ब्रम्हपुरी तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुण आणि इच्छुक उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन ब्रम्हपुरीच्या प्रांत अधिकारी पर्वणी पाटील आणि तहसीलदार सतीश मासाळ यांनी केले आहे.
या सेवा केंद्रांसाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १४ ऑगस्ट २०२६ आहे. अंतिम मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांना विविध शासकीय दाखले आणि सेवा गावातच उपलब्ध व्हाव्यात, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. निवड प्रक्रिया माहिती तंत्रज्ञान विषयक शासकीय धोरण, १९ जानेवारी २०१८, सामान्य प्रशासन विभागाच्या २७ मार्च २०२५ रोजीच्या शासन निर्णयासह इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाच्या ९ जुलै २०२६ रोजीच्या शासन शुद्धिपत्रकातील सुधारित मार्गदर्शक तत्त्वांनुसार पारदर्शक पद्धतीने राबवली जात आहे.
‘आपले सरकार सेवा केंद्रां’च्या माध्यमातून नागरिकांना सातबारा, आठ-अ उतारा, जात प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र यांसह विविध शासकीय सेवांचा लाभ मिळू शकणार आहे. तसेच संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना यांसारख्या कल्याणकारी योजनांसाठी अर्ज करण्याची सुविधाही उपलब्ध होणार आहे.
या उपक्रमामुळे नागरिकांना शासकीय कामांसाठी तालुक्याच्या ठिकाणी वारंवार जाण्याची गरज कमी होणार असून वेळ आणि पैशांची बचत होण्याची अपेक्षा आहे. दुसरीकडे, गावातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी हे सेवा केंद्र स्वयंरोजगाराचे प्रभावी माध्यम ठरू शकते.
इच्छुक उमेदवारांनी चंद्रपूर जिल्हा प्रशासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज सादर करावा. अंतिम तारीख १४ ऑगस्ट २०२६ असल्याने इच्छुकांनी वेळेत अर्ज करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.






















