ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख) देशभरात गाजत असलेल्या ‘पेपर फुटी’च्या प्रकरणावरून सध्या संपूर्ण देशात आणि राज्यात विद्यार्थी व पालकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. या मुद्द्यावरून संसदेत ‘इंडिया’ आघाडीने सरकारला घेरले असतानाच, याचे हिंसक पडसाद आता स्थानिक पातळीवरही उमटू लागले आहेत. ब्रह्मपुरी शहरात यावरून भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमनेसामने आले असून, दोन्ही पक्षांमधील आरोप-प्रत्यारोपांमुळे स्थानिक राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे.
ब्रह्मपुरीतील भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेसवर विद्यार्थ्यांची दिशाभूल केल्याचा गंभीर आरोप केला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी हे देशभरात पेपर फुटीच्या नावाखाली विद्यार्थ्यांना खोटी माहिती देत असून, राजकीय फायद्यासाठी त्यांची दिशाभूल करत असल्याचा दावा भाजपने केला. पेपर फुटीच्या मानसिक त्रासामुळे अनेक निष्पाप युवकांनी आत्महत्या केल्याची वस्तुस्थिती नाकारता येत नसली, तरी विरोधक या संवेदनशील विषयाचे केवळ राजकारण करत असल्याचा आरोप करत भाजप कार्यकर्त्यांनी ब्रह्मपुरी येथील काँग्रेस कार्यालयावर थेट मोर्चा काढला. सत्ताधाऱ्यांच्या या अनपेक्षित पवित्र्यामुळे शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
भाजपच्या या मोर्चाला काँग्रेस कार्यकर्त्यांनीही अत्यंत आक्रमकपणे प्रतिउत्तर दिले. काँग्रेस कार्यालयाबाहेर दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आमनेसामने आल्याने घोषणाबाजीतून संघर्ष अधिक तीव्र झाला. काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजप नेत्यांच्या भूमिकेचा निषेध करण्यासाठी त्यांना प्रतीकात्मकरीत्या ‘बेशरमांची झाडे’ भेट दिली. केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत काँग्रेसने भाजपचा हा मोर्चा हाणून पाडला. स्वतःच्या अपयशावर पांघरूण घालण्यासाठीच भाजप आंदोलन करत असल्याचा पलटवार काँग्रेसने केला.
या राजकीय संघर्षानंतर सर्वसामान्य जनतेतून आणि विरोधी गोटातून भाजप सरकारच्या धोरणांवर तीव्र आक्षेप घेतला जात आहे. देशातील खालील ज्वलंत प्रश्नांकडे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला:
एकीकडे देश आणि राज्य अशा अनेक गंभीर संकटांचा सामना करत असताना, सत्ताधारी मात्र केवळ आपल्या सत्तेच्या मग्रुरीत असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे. विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात ढकलणाऱ्या या संपूर्ण प्रकरणावर आता जनतेनेच विचार करण्याची वेळ आली आहे. भाजपला खरोखरच विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्याची आणि हिताची काळजी आहे की केवळ आपली खुर्ची टिकवून ठेवण्याचा नशा, याचा अंतिम कौल आता जनतेच्या न्यायालयातच लागणार आहे.






















