बजाज आणि कोलते पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने वानवडीत भव्य वृक्षारोपण अभियानाला सुरुवात
पुणे, प्रतिनिधी : पर्यावरण संवर्धन आणि हरित परिसर निर्मितीचा संदेश देत राज्य राखीव पोलीस बल (एसआरपीएफ) गट क्र. १, वानवडी येथे बजाज कंपनी आणि कोलते पाटील प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य वृक्षारोपण अभियानाला प्रारंभ करण्यात आला. या अभियानाअंतर्गत एकूण ६,६१० वृक्षांची लागवड करण्यात येणार असून त्यापैकी ३,८०० वृक्ष उपलब्ध करून प्रत्यक्ष वृक्षारोपणास सुरुवात करण्यात आली आहे.
या उपक्रमात बजाज कंपनीकडून ३,०१०, तर कोलते पाटील प्रायव्हेट लिमिटेडकडून ३,६०० वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. पर्यावरण संरक्षणासाठी उद्योग क्षेत्र आणि शासकीय यंत्रणांनी एकत्रितपणे पुढाकार घेतल्याने या अभियानाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
कार्यक्रमास विजयकुमार मगर (भा.पो.से.), पोलीस उप-महानिरीक्षक, पुणे परिक्षेत्र यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रारंभ झाला. यावेळी रविंद्रसिंह परदेशी (भा.पो.से.), समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र. १, स्वप्ना गोरे, समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र. २ तसेच डॉ. शंतनू जगदाळे, माजी वृक्ष प्राधिकरण सभासद, पुणे महानगरपालिका उपस्थित होते.
बजाज कंपनीतर्फे महेश कुंकूलोळ, गणेश झेंडे, अभिजित काळभोर आणि शफी मोकाशी, तर कोलते पाटील प्रायव्हेट लिमिटेडतर्फे विनायक जोगदेव आणि जाफर पटेल यांनी अभियानात सक्रिय सहभाग नोंदविला.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी वृक्षारोपण ही केवळ औपचारिकता नसून वृक्षांचे संगोपन आणि संवर्धन ही सामूहिक जबाबदारी असल्याचे अधोरेखित केले. वाढते प्रदूषण आणि हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर अशा उपक्रमांची गरज अधिक महत्त्वाची असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या अभियानामुळे एसआरपीएफ गट क्र. १ चा परिसर अधिक हिरवागार होण्यास मदत होणार असून पर्यावरण संरक्षणाच्या दिशेने एक सकारात्मक आणि दीर्घकालीन पाऊल उचलले गेल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.






















