Times of Maharashtra Desk : नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर दौंड शहरातील राजकारणात मोठी हालचाल सुरू झाली आहे. आगामी निवडणुकीत भाजपाचे आमदार राहुल कुल, माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया (नागरिक हित संरक्षण मंडळ–आरपीआय–पीआरपी आघाडी) व राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार रमेश थोरात, माजी जि.प. सदस्य वीरधवल जगदाळे यांनी आपापले पॅनल मजबूत करण्याची तयारी सुरू केली आहे.
याच पार्श्वभूमीवर कुल–कटारिया गटाने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ला जबर धक्का देत माजी उपनगराध्यक्ष वसीम शेख यांना आपल्या पॅनलमध्ये सामावून घेतले. या प्रवेशासाठी बादशहा शेख यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याची माहिती मिळते. शहरात झालेल्या विशेष कार्यक्रमात वसीम शेख यांनी नागरिक हित संरक्षण मंडळ–विकास आघाडी मध्ये अधिकृत प्रवेश केला.
या कार्यक्रमाला आमदार राहुल कुल, प्रेमसुख कटारिया, बादशहा शेख, योगेश कटारिया, माजी नगरसेवक इस्माईल शेख, राजेश गायकवाड तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश जगदाळे उपस्थित होते.
वसीम शेख यांच्या या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद कमकुवत झाल्याची चर्चा असून, आगामी नगरपालिका निवडणुकीत दौंड शहरात अनपेक्षित वळण पाहायला मिळू शकते, असा राजकीय वर्तुळात अंदाज व्यक्त केला जात आहे.






















