देऊळगावराजा (प्रतिनिधी साठी बबनराव नागरे) : तालुक्यात सध्या डिझेल व पेट्रोलची कृत्रिम टंचाई निर्माण झाल्याने सर्वसामान्य नागरिकांसह पत्रकारांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. वार्तांकनासाठी दिवसरात्र तालुकाभर फिरणाऱ्या पत्रकारांना वेळेवर इंधन उपलब्ध होत नसल्याने बातमी संकलन व प्रसारणाच्या कामावर परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकारांसाठी राखीव कोट्यातून पेट्रोल व डिझेल उपलब्ध करून देण्यासाठी विशेष पासेस देण्यात यावेत, अशी मागणी व्हाईस ऑफ मीडियाच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार देऊळगावराजा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यात डिझेल-पेट्रोलची आवक कमी झाल्याने ज्या ज्या पेट्रोल पंपावर इंधन उपलब्ध होते, तेथे वाहनधारकांची मोठी गर्दी होत आहे. अनेक वेळा पत्रकारांना तासन्तास रांगेत उभे राहूनही इंधन मिळत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. पत्रकारांना अपघात, नैसर्गिक आपत्ती, शासकीय कार्यक्रम, सामाजिक घडामोडी तसेच विविध घटनांचे वार्तांकन करण्यासाठी सतत प्रवास करावा लागतो. अशा परिस्थितीत इंधनाअभावी वार्तांकनावर परिणाम होणे ही चिंतेची बाब असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पत्रकारांवर समाजापर्यंत अचूक व तातडीची माहिती पोहोचविण्याची मोठी जबाबदारी असते. ग्रामीण भागातील अनेक घटनांचे वार्तांकन करण्यासाठी पत्रकारांना दुर्गम भागातही जावे लागते. मात्र सध्याच्या इंधनटंचाईमुळे त्यांचे काम अडचणीत आले असून प्रशासनाने पत्रकारांच्या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली आहे.
पत्रकारांना वार्तांकनासाठी वेळेवर पेट्रोल व डिझेल उपलब्ध व्हावे यासाठी प्रशासनाने विशेष बाब म्हणून राखीव कोट्यातून इंधन पासेस देण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी व्हाईस ऑफ मीडियाने केली आहे.
हे निवेदन व्हाईस ऑफ मीडियाचे अध्यक्ष विलास जगताप, जिल्हा कार्याध्यक्ष सुनिल मतकर, जिल्हा उपाध्यक्ष मुशीर कोटकर, तालुका कार्याध्यक्ष अशरफ पटेल, तालुका सचिव सन्मती जैन, तालुका उपाध्यक्ष विजय जाधव, शे. हनिफ तालुका कोषाध्यक्ष पुजा कायंदे, अर्जुन आंधळे, प्रदीप हिवाळे,देवानंद झोटे,नंदू देशमुख,बाबुराव नागरे, महंमद जमील यांच्या स्वाक्षरीने तहसीलदार कार्यालयास सादर करण्यात आले.






















