E–C–I फॉर्म्युलातून घडते यशस्वी व्यक्तिमत्त्व : समीर शेख; डॉ. कलाम, आंबेडकर यांच्या उदाहरणातून तरुणांना मार्गदर्शन
शिक्षणच खरी ताकद, संवाद ही ओळख, उत्पन्न ही प्रगतीची किल्ली”
पुणे (संपादक मुज्जम्मील शेख) : न्यू मोदी खाना मस्जिद कॅम्प येथे पैगंबर जयंती जशने नबी निमित्त पुण्यातील नावाजलेले मोटिव्हेशनल स्पीकर समीर शेख यांच्या व्याख्यानाचा प्रेरणादायी कार्यक्रम संपन्न झाला. या प्रसंगी त्यांनी E – Education, C – Communication, I – Income या तीन सूत्रांवर विशेष मार्गदर्शन केले.
समीर शेख यांनी आपल्या व्याख्यानात शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करताना अनेक महान व्यक्तींचे उदाहरण दिले. “जर शिक्षण नसेल तर व्यक्तीची ओळख जगात उमटत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भारताचे माजी राष्ट्रपती व प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची उंची ही केवळ शिक्षण, संवादकौशल्य संकल्पनेतून घडलेली आहे,” असे त्यांनी नमूद केले.
त्यांनी उपस्थित नागरिकांना आवाहन केले की शिक्षण हीच खरी ताकद आहे, संवाद ही व्यक्तिमत्त्वाची ओळख आहे आणि उत्पन्न ही कुटुंब व समाजाच्या प्रगतीची किल्ली आहे. या तिन्ही गोष्टींचा संगम साधल्यास कोणताही तरुण समाजात व देशात मोठे योगदान देऊ शकतो, असा आत्मविश्वास शेख यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमाला परिसरातील अनेक नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पैगंबर जयंतीच्या पार्श्वभूमीवर न्यू मोदी खाना मस्जिदच्या वतीने आयोजित हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरला. उपस्थितांनी समीर शेख यांचे व्याख्यान प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरल्याचे सांगितले.






















