विनोद पवार (जळगाव प्रतिनिधी) : जळगाव महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले. महायुतीतच जोरदार चुरस पाहायला मिळत असून, भाजपकडून महापौरपदासाठी तब्बल ६ अर्ज तर शिवसेना (शिंदे गट) कडून २ अर्ज दाखल करण्यात आले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि अपक्ष नगरसेवकांच्या पाठिंब्यामुळे महायुतीचे संख्याबळ भक्कम झाले आहे. त्यामुळे महापौरपद भाजपकडे तर उपमहापौरपद शिवसेनेच्या वाट्याला जाण्याची दाट शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.
भाजपकडून शहर सरचिटणीस विशाल त्रिपाठी आणि गटनेते प्रकाश बालाणी यांनी महापौरपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. उपमहापौरपदासाठी नितीन बर्डे यांनी ४ अर्ज, तर प्रा. डॉ. चंद्रशेखर पाटील यांनी २ अर्ज सादर केले आहेत.
दुसरीकडे, शिवसेना (शिंदे गट) कडून नगरसेवक मनोज चौधरी यांनी महापौरपदासाठी २ आणि उपमहापौरपदासाठीही २ अर्ज दाखल करून आपली ताकद दाखवली आहे.
आता अर्जांची छाननी आणि माघारीनंतर कोणत्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब होणार, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
२ फेब्रुवारी रोजी महापौर-उपमहापौर पदाचे चित्र स्पष्ट होणार आहे.






















