राहुल आढाव, संघराज गायकवाड (दौंड प्रतिनिधी) : दौंड येथील गोपाळवाडी रोडवरील महालक्ष्मी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलसमोरील बेशिस्त पार्किंग संदर्भात काल टाइम्स ऑफ महाराष्ट्र मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीची थेट दखल घेत आज वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी प्रत्यक्ष येऊन कारवाई केली.
हॉस्पिटलला स्वतंत्र पार्किंग व्यवस्था असतानाही रस्त्यावरच हॉस्पिटलशी संबंधित ॲम्बुलन्स व रुग्णांच्या वाहनांची बेशिस्त पार्किंग केली जात असल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत होता. विशेषतः सायंकाळी पाच वाजल्यानंतर शाळा सुट्टी व कंपनीच्या वाहनांच्या वेळेत येथे मोठी गर्दी होत असून पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे वास्तव बातमीतून समोर आणण्यात आले होते.
या वृत्ताची गंभीर दखल घेत आज वाहतूक पोलिसांनी महालक्ष्मी हॉस्पिटलसमोरील रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांवर कारवाई करत संबंधितांना स्पष्ट सूचना दिल्या.
‘टाइम्स ऑफ महाराष्ट्र’च्या वृत्ताची दखल घेत प्रशासनाकडून तातडीने कार्यवाही करण्यात आल्याने गोपाळवाडी रोडवरील वाहतूक काही प्रमाणात सुरळीत झाली असून, नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.






















