Times Of Maharashtra Desk : नागपुर जिल्ह्यातील राऊळगाव येथे 1 मार्च 2026 रोजी घडलेल्या SBL Energy Limited मधील भीषण स्फोट प्रकरणात तपास अहवालातून गंभीर निष्काळजीपणाचा धक्कादायक खुलासा समोर आला आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत 19 निष्पाप कामगारांचा मृत्यू झाला असून 22 जण जखमी आहेत. त्यापैकी 12 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
प्राथमिक तपासात Petroleum and Explosives Safety Organisation (PESO) आणि Directorate of Industrial Safety and Health (DISH) यांनी कंपनीकडून सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन झाल्याचे नमूद केले आहे. जून 2024 मध्येच तपास पथकाने कंपनीला भेट देऊन अनेक त्रुटी दाखवून दिल्या होत्या आणि आवश्यक सुधारणा करण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र त्या सूचनांकडे कंपनीने दुर्लक्ष केल्याचे अहवालात स्पष्ट झाले आहे.
स्फोटक पदार्थांची सुरक्षित साठवणूक न करता नोनल क्रिंपिंग युनिटमध्येच त्यांचा साठा ठेवण्यात आला होता. आग नियंत्रणासाठी आवश्यक फायर ट्रेलर पंप उपलब्ध नव्हता. नियमानुसार दोन सुरक्षा अधिकारी असणे बंधनकारक असताना केवळ एकच अधिकारी कार्यरत होता. आरोग्य अधिकारी नेमलेला नव्हता, तसेच फ्लेमप्रूफ सीसीटीव्ही कॅमेरेही बसवले नव्हते. 809 कामगारांपैकी केवळ 183 जणांचीच आरोग्य तपासणी करण्यात आली होती.
या प्रकरणी पोलिसांनी 11 आरोपींना अटक केली आहे. मात्र कंपनीचा मालक आलोक चौधरी अद्याप फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी तीन विशेष पथके कार्यरत आहेत. या दुर्घटनेमुळे औद्योगिक सुरक्षेच्या अंमलबजावणीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.






















