Times of Maharashtra : पुणे महापालिकेतील कथित भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील आरोप-प्रत्यारोप हे केवळ दिखावा असून, जनतेच्या मूलभूत प्रश्नांपासून लक्ष हटवण्याचा हा प्रयत्न आहे, अशी घणाघाती टीका शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली. गुरुवारी पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
प्रभाग क्रमांक २५ पुनावळे–ताथवडे येथील शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी अंधारे शहरात आल्या होत्या. यावेळी जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार गौतम चाबुकस्वार, निवडणूक प्रभारी अशोक वाळके, उपजिल्हा प्रमुख रोमी संधू, कैलास नेवासकर यांची उपस्थिती होती.
अंधारे म्हणाल्या, भाजपचे आमदार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत असले, तरी सत्तेसाठी त्याच नेत्यांनी त्यांना जवळ केल्याचे चित्र महाराष्ट्राने पाहिले आहे. त्यामुळे हे आरोप म्हणजे नुसती ‘नुरा कुस्ती’ आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेला ‘कुबेराची खाण’ संबोधत त्यांनी सत्ताधारी पक्षांवर गंभीर आरोप केले. सत्तेच्या लालसेपोटी महापालिकेची आर्थिक स्थिती डबघाईला आली असून, आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वाखाली महापालिका कर्जाच्या ओझ्याखाली दबली आहे, असा दावा त्यांनी केला.
स्मार्ट सिटीच्या नावाखाली शहराच्या विकासाचे चित्र रंगवले जात असले, तरी प्रत्यक्षात पुनावळे आणि ताथवडे परिसरातील नागरिक आजही रस्ते, पाणी, वीज, ड्रेनेजसारख्या मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करत असल्याचे अंधारे यांनी सांगितले. शहरातील खऱ्या प्रश्नांवर चर्चा न होता केवळ आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत, असेही त्या म्हणाल्या.
याशिवाय निवडणूक प्रक्रियेत दबाव तंत्राचा वापर होत असल्याचा आरोप करत त्यांनी सांगितले की, शिवसेनेच्या उमेदवारांना धमकावून निवडणुकीतून माघार घेण्यास भाग पाडण्याचे प्रकार घडले आहेत. आता उमेदवार आणि कार्यकर्त्यांना घाबरवून प्रचार यंत्रणाच राबवू दिली जात नाही,असा आरोप करत अंधारे यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली






















