धनंजय देवंग्रे (लातूर प्रतिनिधी ) : संत तुकाराम महाराज यांच्या पवित्र पादुकांचे लातूर शहरात आगमन होताच संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. वारकरी संप्रदायाच्या दिंड्यांसह टाळ-मृदुंगाच्या गजरात आणि अभंगांच्या सुरावटीत पादुकांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. ज्ञानोबा-तुकाराम च्या जयघोषाने शहर दुमदुमून गेले.
पादुका खंडापूर येथे पोहोचताच पारंपरिक रिंगण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. वारकरी भाविकांनी मोठ्या श्रद्धा आणि उत्साहात रिंगणात सहभाग नोंदवला. भक्ती, समर्पण आणि आध्यात्मिक ऊर्जा यांचा अद्भुत संगम या वेळी अनुभवायला मिळाला.
रिंगण सोहळा हा वारकरी परंपरेतील अत्यंत महत्त्वाचा आणि भावनिक क्षण मानला जातो. पादुकांच्या दर्शनासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. स्थानिक ग्रामस्थ व विविध संस्थांनी भाविकांसाठी पिण्याचे पाणी, प्रसाद व इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून सेवा बजावली.
या भक्तिमय कार्यक्रमामुळे लातूर परिसरात समाधान, शांतता आणि अध्यात्मिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. संत परंपरेचा संदेश आणि वारकरी संस्कृतीची परंपरा जनमानसात दृढ झाली आहे.






















