शिरपूर, धुळे:(प्रतिनिधी तुषार शेटे) मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा जन्मदिवस व माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंती निमित्ताने दिनांक 22 जुलै रोजी शिरपूर विधानसभा मतदारसंघात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर घेण्यात आले. सदर शिबीर राजगोपाल भंडारी हॉल, मेन बिल्डिंग शिरपूर या ठिकाणी घेण्यात आले. गतिमान प्रशासन तथा आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण या योजनेअंतर्गत महसुली क्षेत्रीय कार्यालयाकडून जनतेस सोयी सुविधा उपलब्ध करून देणे, हा या शिबिराचा मुख्य उद्देश होता.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विधानपरिषदेचे आमदार अमरीशभाई पटेल हे उपस्थित होते. तर प्रमुख अतिथी म्हणून शिरपूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार काशिरामदादा पावरा हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. शरद मंडलिक यांनी केले. प्रास्ताविकपर मनोगतामध्ये त्यांनी महसूल विभागाकडील मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजना, 2011 पूर्वीची गावठाण हद्दीतील निवासी अतिक्रमणे नियमाकुल करणे यासारख्या विविध लोकोपयोगी योजनांवर प्रकाश टाकला.
यावेळी विविध विभागाच्या लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रातिनीधिक स्वरूपात लाभ वाटप करण्यात आले. शिबिराच्या अनुषंगाने महसूल विभागामार्फत विविध योजना अंतर्गत 3214 लाभार्थ्यांना लाभ वितरण करण्यात आले. नगरपालिका- 1136, कृषी विभाग- 2004, पंचायत समिती-500, महावितरण – 1401, सहाय्य्क निबंधक – 325, शिक्षण विभाग – 367, आरोग्य विभाग -786, उपअधिक्षक भूमी अभिलेख – 35, महिला व बालविकास विभागामार्फत 500 महिलांना लाभ वाटप करण्यात आले. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ शिरपूर आगारातर्फे शालेय विद्यार्थिनींना अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत मोफत पास चे वितरण करण्यात आले. यावेळी विविध विभाग मार्फत सुमारे 10300 पेक्षा अधिक लाभार्थ्यांना विविध योजनांचे लाभ देण्यात आले.

आमदार काशीरामदादा पावरा यांनी आपल्या मनोगतामध्ये शिरपूर तालुक्यातील प्रशासनामार्फत सर्व योजना अतिशय प्रभावीपणे राबविण्यात येत असल्याचे नमूद केले.

अध्यक्षीय समारोपामध्ये आमदार अमरीशभाई पटेल यांनी शासनाच्या विविध योजनांचा तालुक्यात दिलेल्या लाभांबाबत लेखाजोखा मांडला. शासनाच्या वतीने लोकोपयोगी निर्णय घेत असलेबाबत त्यांनी मा.मुख्यमंत्री महोदयांचे यावेळी अभिनंदन देखील केले. कार्यक्रमादरम्यान सर्वांनी दोन मिनिट स्तब्धता पाळून स्वर्गीय अजित दादांना श्रद्धांजली अर्पण केली.
सदर कार्यक्रमासाठी तहसीलदार महेंद्र माळी, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, बाजार समितीचे सभापती के डी पाटील, देवेंद्र पाटील, शिरपूर नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षा संगीताताई देवरे, नगरसेवक शामकांत ईशी, वासुदेव देवरे, राजगोपाल भंडारी, हेमंत पाटील, तालुका कृषी अधिकारी के एस गोपाळ, उप अधीक्षक भूमी अभिलेख विष्णू भाबड, सहाय्यक निबंधक राजेंद्र विरकर, सहाय्यक गट विकास अधिकारी भावना पाटील, महिला व बाल कल्याण अधिकारी संगीता तोरावणे, वैशाली निकम, गटशिक्षण अधिकारी विठ्ठल घुगे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अष्टपाल अहिरे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनील पावरा, आगार व्यवस्थापक मनोज पाटील, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. कुलदीप भामरे, ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे रामचंद्र पाटील, दुय्यम निबंधक गणेश सूर्यवंशी यासह विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.






















