जळगाव(प्रतिनिधी : विनोद पवार) : लाचलुचपत प्रतिबंधक विभागच्या पथकाने जळगाव येथे महसूल विभागातील लाचखोरी प्रकरणात मंडळ अधिकारी आणि एका खासगी व्यक्तीविरुद्ध कारवाई केली आहे. या घटनेमुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली असून रामानंद नगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराविरोधात शेतातील कथित अवैध खोदकामाबाबत स्थानिक नागरिकांनी महसूल विभागासह विविध कार्यालयांकडे तक्रारी दिल्या होत्या. या प्रकरणातील चौकशी अनुकूलरीत्या निकाली काढण्यासाठी मंडळ अधिकारी मिलींद देवरे यांनी सुरुवातीला एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे. चर्चेनंतर ही रक्कम पन्नास हजार रुपयांवर ठरल्याचे समोर आले.
तक्रारदाराने याबाबत नाशिक येथील एसीबीकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचला. तपासादरम्यान मंडळ अधिकारी देवरे यांनी तक्रारदाराला लाचेची रक्कम खासगी व्यक्ती सुरेंद्र प्रल्हाद अहिरे याच्याकडे देण्यास सांगितल्याचे निष्पन्न झाले.
पिंप्राळा येथील तलाठी कार्यालयाबाहेर उभारण्यात आलेल्या सापळ्यात सुरेंद्र अहिरे हा पन्नास हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले. त्यानंतर दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
या कारवाईत एसीबीचे सापळा अधिकारी राहुलकुमार नाईक, हवालदार प्रफुल्ल माळी आणि विलास निकम यांनी सहभाग घेतला. पुढील तपास पोलिस निरीक्षक हेमंत नागरे करीत आहेत.






















