विनोद पवार ( जळगाव प्रतिनिधी ) : एरंडोल शहरासाठी महत्त्वाचा ठरणारा वाहन अंडरपास प्रकल्प अखेर मार्गी लागला आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील तरसोद–फागणे पट्ट्यात कासोदा रस्ता आणि पारोळा बायपासवरील धरणगाव चौफुली येथे अंडरपास उभारण्यासाठी सुमारे ८० कोटी रुपयांचा निधी केंद्र सरकारकडून मंजूर झाला आहे. खासदार स्मिता वाघ यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे या कामाला हिरवा कंदील मिळाल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.
धरणगाव चौफुली परिसरात वाढती वाहतूक आणि वारंवार होणारे अपघात ही गंभीर समस्या बनली होती. स्थानिक नागरिक, व्यापारी आणि शेतकरी यांच्याकडून सुरक्षिततेची मागणी सातत्याने होत होती. महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामासोबतच या दोन ठिकाणी अंडरपास उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या प्रकल्पामुळे स्थानिक आणि महामार्गावरील वाहतूक वेगळी होणार असून अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. प्रवास अधिक सुरक्षित आणि जलद होईल, तसेच शेतमाल वाहतूक आणि व्यापारालाही चालना मिळेल. लवकरच प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार असून एरंडोलच्या पायाभूत सुविधांमध्ये ही महत्त्वाची भर ठरणार आहे.






















