मारेगाव (प्रतिनिधी देवा आत्राम) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत ८ ते १४ एप्रिल २०२६ दरम्यान ‘सामाजिक समता सप्ताह’ आयोजित करण्यात आला आहे. या सप्ताहाचा शुभारंभ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे बुधवारी उत्साहात झाला.
उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी उपायुक्त तथा जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या सदस्य प्राजक्ता इंगळे उपस्थित होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून महिला व बाल कल्याणचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल जाधव, बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक विशाल नगराळे, तसेच संशोधन अधिकारी ज्योत्स्ना तिजारे यांची उपस्थिती होती.
यावेळी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण मंगला मून यांनी सांगितले की, समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांची माहिती ग्रामीण व शहरी भागातील मागासवर्गीय विद्यार्थी, शेतकरी व नागरिकांपर्यंत पोहोचवून त्यांचा शैक्षणिक व सामाजिक दर्जा उंचावणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
कार्यक्रमादरम्यान विविध योजनांअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ वितरित करण्यात आले. यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत गौरव खेकचंद बडोले, दिपक सिद्धार्थ गजभिये, ऐश्वर्या प्रमोद चालखुरे, यश गंगाधर गजभिये यांना लाभ देण्यात आला. तसेच भारत सरकार मॅट्रिकोत्तर परराज्य शिष्यवृत्ती योजनेंतर्गत उज्वला छत्रपती बनसोड, श्रेया श्याम नगराळे, निलेश सुनील बरडे यांना तर छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार योजनेंतर्गत श्वेता राजेंद्र बन्सोड व प्रेरणा दिपक सावळे यांचा सन्मान करण्यात आला.
हा सामाजिक समता सप्ताह ८ ते १४ एप्रिल दरम्यान दररोज सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आला असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समाज कल्याण निरीक्षक अश्विनी राऊत व त्यांच्या पथकाने विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समतादूत रुपेश वानखेडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन ज्योत्स्ना तिजारे यांनी केले.






















