विनोद पवार (जळगाव प्रतिनिधी ) : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) बस सेवेत दिव्यांग प्रवास सवलतीचा गैरवापर होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, बनावट दिव्यांग पास तयार करणाऱ्या रॅकेटने राज्यभरात हातपाय पसरल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.
तपासात असे आढळून आले की, काही ठिकाणी दलालांच्या मदतीने खोट्या वैद्यकीय दाखल्यांच्या आधारे बोगस दिव्यांग पास तयार करून अनेक जण मोफत प्रवास करत होते. यामुळे शासनाचे लाखोंचे आर्थिक नुकसान झाले असून, खऱ्या दिव्यांग लाभार्थ्यांवर अन्याय होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
परिवहन विभागाने अचानक तपासणी मोहीम हाती घेतल्यानंतर अनेक संशयास्पद पास जप्त करण्यात आले. प्राथमिक चौकशीत यातील अनेक पास पूर्णपणे बनावट असल्याचे निष्पन्न झाले आहे.
जळगाव जिल्ह्यासह राज्यातील विविध भागांत ही फसवणूक साखळी सक्रिय असल्याचे संकेत मिळाले असून, संबंधित अधिकाऱ्यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. या प्रकरणाचा तपास अधिक वेगाने सुरू असून, लवकरच मोठी नावे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या घोटाळ्यामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली असून MSRTC प्रशासनावरही गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.






















