संघराज गायकवाड ( दौंड प्रतिनिधी ) : शहरातील प्रभाग क्रमांक ११ मधील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी एक दिलासादायक आणि कौतुकास्पद उपक्रम राबविण्यात आला आहे. या प्रभागात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहनचालक, पादचारी तसेच ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. सातत्याने अपघात होण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात होती.
या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेत गौरव कुल कन्स्ट्रक्शनचे सर्वेसर्वा गौरव कुल यांनी कोणत्याही शासकीय निधीची वाट न पाहता, पूर्णपणे स्वखर्चातून रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे तसेच आवश्यक ठिकाणी स्पीड ब्रेकर बसविण्याचे काम तातडीने हाती घेतले. त्यांच्या या पुढाकारामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, अपघाताची शक्यता लक्षणीयरीत्या कमी होण्यास मदत होईल.
सदर रस्ता हा वर्दळीचा असून या मार्गावरून दररोज शेकडो वाहनांची ये-जा असते. पावसाळ्यानंतर खड्ड्यांचे प्रमाण वाढल्याने दुचाकीस्वार व चारचाकी वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. अनेक वेळा किरकोळ अपघातही घडले होते. ही परिस्थिती लक्षात घेऊन गौरव कुल यांनी सामाजिक बांधिलकी जपत तात्काळ उपाययोजना केली.
दरम्यान, याच प्रभागातील नगरसेविका उज्वला परकाळे यांनी देखील नागरिकांच्या समस्यांकडे लक्ष देत मुख्य रस्त्यावर साचलेल्या कचऱ्याची दखल घेतली. त्यांनी कचरा कामगारांना तातडीने पाचारण करून रस्त्याची साफसफाई करून घेतली. त्यामुळे परिसर अधिक स्वच्छ, आरोग्यदायी व सुरक्षित झाला आहे.
स्थानिक नागरिकांनी गौरव कुल व नगरसेविका उज्वला परकाळे यांच्या या संयुक्त प्रयत्नांचे मनापासून कौतुक केले आहे. शासनाकडून निधी येण्याची वाट न पाहता नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी स्वखर्चातून काम करणे हे खरंच स्तुत्य आहे, अशा प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहेत.
नागरिकांच्या दैनंदिन अडचणी समजून घेऊन करण्यात आलेले हे उपक्रम सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण ठरत असून, इतरांनीही यापासून प्रेरणा घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.






















