गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : गेवराई तालुक्यातील कवडगाव येथील खेडकर वस्तीमध्ये राष्ट्रसंत भगवानबाबा यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा अत्यंत भक्तीमय वातावरणात आणि उत्साहात पार पडला. श्रीक्षेत्र गोरक्षनाथ संस्थानचे महंत ह.भ.प. दत्ता महाराज गिरी यांच्या शुभहस्ते व ब्रह्मवृंदांच्या मंत्रघोषात हा सोहळा विधीवत संपन्न झाला.
या निमित्ताने मंदिर परिसरात सलग तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कीर्तन, भजन, हरिपाठ आणि अन्नदान अशा उपक्रमांमुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने न्हाऊन निघाला. महंत दत्ता महाराज गिरी यांनी केलेल्या कीर्तन सेवेमुळे उपस्थित भाविकांना अध्यात्मिक मार्गदर्शन लाभले.
या सोहळ्याला अनेक मान्यवर व भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. भाजपचे गेवराई तालुका समन्वयक श्रीकांत सानप, पत्रकार विनोद पौळ, ह.भ.प. तुकाराम महाराज गिरी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली. तसेच गावातील महिला, पुरुष आणि वारकरी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.
प्राणप्रतिष्ठेपूर्वी भगवानबाबांच्या मूर्तीची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. टाळ, मृदंगाच्या गजरात आणि जय हरी विठ्ठलच्या घोषात वातावरण दुमदुमून गेले. महिलांनी घरासमोर रांगोळी काढून मिरवणुकीचे ठिकठिकाणी स्वागत केले. बालगोपाळांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी या सोहळ्यात सहभाग घेतला.
ही आकर्षक मूर्ती नाशिक येथून आणण्यात आली असून मंदिरासाठी अंबादास खेडकर यांनी चार गुंठे जमीन दान दिली आहे. तीन दिवसीय कार्यक्रमादरम्यान विविध भाविकांच्या वतीने अन्नदान करण्यात आले. शेवटच्या दिवशी कीर्तनानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
या भव्य कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी खेडकर वस्ती व कवडगाव ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले. संपूर्ण सोहळा भक्ती, श्रद्धा आणि सामाजिक एकोप्याचे उत्तम उदाहरण ठरला.






















