जळगाव (जिल्हा प्रतिनिधी विनोद पवार) : मलकापूरकडून मुक्ताईनगरकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर रविवारी दुपारी भीषण अपघात घडला. पिंप्री अकाराऊत शिवारा परिसरात भरधाव वेगातील पल्सर दुचाकी अनियंत्रित होऊन रस्त्याच्या दुभाजकावर आदळली. या अपघातात दुचाकीवरील तीन तरुण गंभीर जखमी झाले असून परिसरात एकच खळबळ उडाली.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रविवार दि. १८ जानेवारी रोजी दुपारी पल्सर दुचाकी (क्रमांक एमएच ४५ – ९४०६) मलकापूर येथून मुक्ताईनगरच्या दिशेने जात होती. दुचाकीचा वेग प्रचंड असल्याने पिंप्री अकाराऊत गावाजवळील सरळ रस्त्यावर अचानक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. वेग अधिक असल्याने चालकाला दुचाकी सावरणे शक्य झाले नाही आणि काही क्षणांतच दुचाकी जोरात रस्त्याच्या दुभाजकावर आदळली.
अपघात इतका भीषण होता की दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तीनही तरुण रस्त्यावर फेकले जाऊन त्यांना डोके व पायांना गंभीर दुखापत झाली आहे.
अपघाताचा आवाज ऐकून आजूबाजूच्या परिसरातील नागरिक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. महामार्गावरून जाणाऱ्या स्थानिक तरुणांनी व प्रवाशांनी माणुसकी दाखवत जखमींना तात्काळ मदत केली. जखमींना रस्त्याच्या कडेला सुरक्षित ठिकाणी हलवून प्राथमिक उपचार करण्यात आले तसेच पोलिस व रुग्णवाहिकेला तत्काळ माहिती देण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच मुक्ताईनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रुग्णवाहिकेच्या मदतीने जखमींना जवळच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. जखमींची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना उच्चस्तरीय रुग्णालयात हलवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अपघातातील तरुणांची ओळख पटवण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.
दरम्यान, महामार्गावरील वाढता वेग, निष्काळजी वाहनचालक व वाहतूक नियमांकडे होणारे दुर्लक्ष यामुळे अपघातांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याची चिंता नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.






















