Times of Maharashtra Desk: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शहरात तीव्र राजकीय घडामोडी घडल्या. भाजपकडून उमेदवारी नाकारण्यात आल्याच्या निषेधार्थ दिव्या उल्हास मराठे या इच्छूक महिला उमेदवाराने पक्षाच्या स्थानिक कार्यालयाबाहेर टोकाची भूमिका घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने कोणतीही अनर्थकारी घटना टळली.
अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी भाजपच्या छत्रपती संभाजीनगर येथील कार्यालयाबाहेर एबी फॉर्मसाठी इच्छूक उमेदवार व कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. याच दरम्यान काही इच्छूकांना उमेदवारी न मिळाल्याने वातावरण तणावपूर्ण झाले. प्रभाग क्रमांक २० मधील इच्छूक उमेदवार दिव्या मराठे आणि काही कार्यकर्त्यांनी वरिष्ठ नेत्यांच्या केबिनमध्ये जाण्याचा प्रयत्न करत तीव्र संताप व्यक्त केला.
या घटनेनंतर दिव्या मराठे यांनी स्थानिक नेतृत्वावर गंभीर आरोप केले. “मी गेली १८ वर्षे पक्षासाठी काम केले आहे. पक्षासाठी अनेक अडचणी अंगावर घेतल्या. नगरसेवक असताना प्रभागात मोठ्या प्रमाणात विकासकामे केली. सर्व्हेमध्ये नाव असूनही मागील वेळी आणि यावेळीही मला उमेदवारी नाकारण्यात आली,” असा आरोप त्यांनी केला.
त्या पुढे म्हणाल्या, “पक्ष कठीण काळात असताना घरदार बाजूला ठेवून काम केले. आज पक्ष सत्तास्थानी असताना जुन्या आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलले जात आहे. कार्यकर्त्यांनी रस्त्यावर संघर्ष करायचा आणि नेत्यांचे कुटुंबीय आरामात बसायचे, हे अन्यायकारक आहे,” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, भाजपमधील अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांना यावेळी उमेदवारी नाकारण्यात आल्याचे समोर आले आहे. काही इच्छूकांनी निवडणूक लढवण्यासाठी नोकऱ्या सोडल्याचा दावाही कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे. ऐनवेळी उमेदवार बदलण्यात आल्याने असंतोष वाढल्याचे चित्र आहे. या प्रकरणी पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत शांतता राखली. घटनेबाबत पुढील तपास सुरू असून, राजकीय वर्तुळात या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे.






















