Times Of Maharashtra पुणे : शहरात घडलेल्या दोन वेगवेगळ्या गुन्हेगारी घटनांनी नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. विमाननगर परिसरात सुप्रसिद्ध रामेश्वरम कॅफेच्या मालकाच्या घरात चोरी झाल्याची घटना उघडकीस आली असून, दुसऱ्या घटनेत ससून रुग्णालयातून एका आरोपीने पोलिसांच्या ताब्यातून पलायन केले आहे.
विमाननगर येथील रामेश्वरम कॅफेचे मालक आपल्या कुटुंबासह वास्तव्यास असलेल्या घरात चोरी झाली. या प्रकरणी पोलिसांनी बंकेश कंढे नावाच्या एका दरोडेखोराला अटक केली आहे. आरोपीने घराच्या दरवाजाला असलेल्या डिजिटल लॉकचा गैरफायदा घेत चोरी केल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिसांनी आरोपीकडून १ लाख ३२ हजार रुपयांची रोकड जप्त केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी गेल्या तीन महिन्यांपासून सकाळी दूध टाकण्याच्या बहाण्याने फिर्यादीच्या घराजवळ येत होता. दरवाजावरील डिजिटल लॉकवर वारंवार वेगवेगळे पासवर्ड टाकून तो दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत होता. अखेर १७ जानेवारी रोजी त्याचा प्रयत्न यशस्वी ठरला. घरात प्रवेश करून त्याने कपाटातील रोकड लंपास केली. ही संपूर्ण घटना घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, त्याच फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपीला अटक केली.
दरम्यान, पुण्यातील ससून रुग्णालयातूनही धक्कादायक घटना घडली आहे. सनी गौतम कुचेकर नावाचा आरोपी उपचारासाठी दाखल असताना पोलिसांची नजर चुकवून फरार झाला. फिटसारखे झटके येत असल्याने त्याला रविवारी वॉर्ड क्रमांक १६ मध्ये दाखल करण्यात आले होते. सोमवारी प्रकृती सुधारताच त्याने स्वच्छतागृहाच्या काचा काढून आणि इमारतीच्या बाराचा आधार घेत पलायन केले. हा प्रकारही सीसीटीव्हीत कैद झाला असून, पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.






















