Times of Maharashtra Desk: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची एका विवाहसोहळ्यात भेट झाल्याची माहिती समोर आली आहे. संजय राऊत यांच्या व्याही राजेश नार्वेकर यांच्या मुलाचा विवाहसोहळा मुंबईत पार पडला. या सोहळ्याला देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.संजय राऊत यांची प्रकृती काही दिवसांपूर्वी गंभीर बिघडली होती. स्वतः राऊत यांनी सोशल मीडियावरून याबाबत माहिती दिली होती. डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता आणि ते काही दिवस सार्वजनिक जीवनापासून दूर होते. मात्र, त्यांची तब्येत सुधारल्याने गेल्या काही दिवसांत त्यांनी काही कार्यक्रमांना हजेरी लावली आहे.
विवाहसोहळ्यात देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास पंधरा मिनिटे हसतखेळत चर्चा झाली. यावेळी आशिष शेलारही त्यांच्या सोबत बसले होते.काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी भांडूप येथील संजय राऊत यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती. ठाकरे यांनी राऊत यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे सांगत, ते लवकरच राजकारणात सक्रिय होतील असेही नमूद केले होते. त्यानंतर संजय राऊत हे घरात राहून सोशल मीडियावरूनच राजकीय घडामोडींवर भाष्य करत होते. आज मनसेप्रमुख राज ठाकरे हेही राऊतांची भेट घेणार असल्याची माहिती आहे.
विवाहसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या कार्यक्रमाला उद्धव ठाकरेही उपस्थित होते. मात्र, उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली की नाही, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांच्या या भेटीमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात अनेक प्रश्न निर्माण झाले असून पक्षांमध्ये खळबळ उडाली आहे.






















