धीरज महांगरे (पुणे प्रतिनिधी) : पुण्यातील हडपसर परिसरात अपघातांची मालिका सुरूच असून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वाहनचालकांचा जीव धोक्यात येत असल्याची गंभीर बाब पुन्हा समोर आली आहे. आज पहाटे सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास वैभव थिएटरसमोरून नोबेल हॉस्पिटलकडे जाणाऱ्या उड्डाणपुलाच्या सुरुवातीला एक ईर्टिगा कार थेट पुलाच्या कठड्यावर चढल्याची घटना घडली. सुदैवाने या अपघातात मोठी जीवितहानी टळली असली तरी या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या अपघाताची माहिती परिसरातील सजग नागरिक गजानन मोहिते यांनी दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, या उड्डाणपुलाची सुरुवात नेमकी कुठून होते हे वाहनचालकांना स्पष्टपणे कळत नाही. त्यामुळे अचानक पुल सुरू होत असल्याचा अंदाज न आल्याने वाहनचालक गोंधळून जातात आणि अपघात घडण्याची शक्यता वाढते.
यापूर्वीही या ठिकाणी अनेक वेळा अपघात घडले असून याबाबत सामाजिक कार्यकर्ते तसेच टाइम्स ऑफ महाराष्ट्रचे पुणे शहर प्रतिनिधी धीरज महांगरे यांनी पुणे महानगरपालिकेकडे तक्रार केली होती. त्यानंतर प्रशासनाने तात्पुरत्या स्वरूपात काही रिफ्लेक्टर स्टिक लावल्या होत्या. मात्र कालांतराने त्या खराब झाल्यामुळे वाहनचालकांना योग्य सूचना मिळत नाहीत.
विशेषतः रात्री किंवा पहाटे कमी प्रकाशामुळे वाहनचालकांना उड्डाणपुलाची सुरुवात लक्षात येत नाही. त्यामुळे वाहन अचानक कठड्याकडे वळते आणि अपघात घडतात. ही परिस्थिती अत्यंत धोकादायक असल्याने तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज असल्याचे नागरिकांचे मत आहे.
या ठिकाणी येलो ब्लिंकिंग लाईट, स्पष्ट रिफ्लेक्टर साईन बोर्ड तसेच योग्य रोड मार्किंग बसविणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे वाहनचालकांना आधीच सूचना मिळून अपघात टाळता येऊ शकतात.
पुणे महानगरपालिकेने या गंभीर प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते आणि टाइम्स ऑफ महाराष्ट्रचे पुणे शहर प्रतिनिधी धीरज महांगरे यांनी केली आहे. अन्यथा भविष्यात होणाऱ्या अपघातांची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.






















