Times Of Maharashtra Didsk : राज्यातील २९ महानगरपालिकांतील महापौरपदासाठी आज आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली. या सोडतीनंतर पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेतील महापौरपदाचं चित्र स्पष्ट झालं असून, याद्वारे आता संभाव्य नावांची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
आरक्षण जाहीर
पुणे महानगरपालिकेत महापौरपदासाठी सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षण निश्चित झालं आहे. त्यामुळे पुण्यात पुढील महापौर महिला असणार, यावर शिक्कामोर्तब झालं आहे. विशेष म्हणजे, पुण्यात भाजपकडून सर्वसाधारण प्रवर्गातील महिला महापौर होणार असल्याचं स्पष्ट झाल्याने शहरात ‘महिला राज’ पाहायला मिळणार आहे. या आरक्षणामुळे महापौरपदासाठी इच्छुक असलेल्या दिग्गज पुरुष नेत्यांची स्वप्नं अपूर्ण राहणार आहेत.
पिंपरी-चिंचवडमध्ये उत्सुकता पोहचली शिगेला!!
दरम्यान, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत महापौरपदासाठी सर्वसाधारण (खुल्या) प्रवर्गाचं आरक्षण जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळे या ठिकाणी महिला अथवा पुरुष, कोणताही नगरसेवक महापौरपदाचा दावेदार असू शकतो. भाजपचे तब्बल ८४ नगरसेवक असल्याने, प्रत्यक्षात हा मान कोणाला मिळणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
विशेष म्हणजे, पिंपरी-चिंचवडसाठी सुरुवातीला खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षण असल्याची चर्चा होती. मात्र शासनाच्या अधिकृत यादीत खुल्या प्रवर्गासाठी आरक्षण असल्याचं स्पष्ट झालं. या गोंधळामुळे काही काळ राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगल्या.
पुण्यात महापौरपदासाठी चर्चेत असलेली नावे
महापौरपद महिलांसाठी राखीव झाल्यानंतर पुण्यात भाजपच्या अनेक महिला नगरसेविकांची नावे चर्चेत आली आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने पुढील नावांचा समावेश आहे —
रंजना टिळेकर – प्रभाग क्रमांक ४० (कोंढवा बुद्रुक–येवलेवाडी) मधून विजयी; शिवसेना ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांचे पुत्र रुपेश मोरे यांचा पराभव
रोहिणी चिमटे – प्रभाग क्रमांक २९ (खराडी–मांजरी बुद्रुक) मधून भाजपच्या तिकीटावर निवडून आलेल्या
मंजुषा नागपुरे – अनुभवी नेत्या; सिंहगड रोड परिसरात मजबूत जनसंपर्क, बिनविरोध निवड
वीणा घोष – प्रभाग क्रमांक ३६ (धायरी–नऱ्हे) मधून विजयी
प्राची आल्हाट – प्रभाग क्रमांक ४१ (महमदवाडी–कौसरबाग) मधून नगरसेविका
मृणाल कांबळे – प्रभाग क्रमांक २२ (काशेवाडी–डायस प्लॉट) मधून विजयी; माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांच्या कुटुंबीयांचा पराभव
वर्षा तापकीर – धनकवडी–कात्रज डेअरी प्रभाग क्रमांक ३७(ब)
मानसी मनोज देशपांडे – प्रभाग क्रमांक २०(क) शंकर महाराज मठ, बिबवेवाडी
महापौरपदासाठीची अधिकृत निवड प्रक्रिया लवकरच पार पडणार असून, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये नेमका कोणत्या चेहऱ्यावर महापौरपदाची माळ पडते, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.






















