सिन्नर 🙁 प्रतिनिधी नवनाथ आव्हाड ) सिन्नर वनपरिक्षेत्रातील वांगडद बीटअंतर्गत दापूर येथील गट क्रमांक ५४४ मधील वन विभागाच्या रोपवाटिका परिसरात मोरांची शिकार करणाऱ्या दोन संशयित आरोपींना वनविभागाच्या पथकाने रंगेहात पकडून अटक केली. ही कारवाई शनिवार, दि. १८ जुलै २०२६ रोजी करण्यात आली.

वनविभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत स्थानिक ग्रामस्थांनीही सहकार्य केले.
अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे सागर बाळू आगीवाले आणि सुनील लक्ष्मण निरगुडे अशी असून, त्यांच्या ताब्यातून शिकारीसाठी वापरण्यात आलेला एक गावठी कट्टा, दोन बॅटऱ्या तसेच शिकार केलेले दोन मृत मोर जप्त करण्यात आले आहेत.
या प्रकरणी दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४१३/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना माननीय न्यायदंडाधिकारी, सिन्नर यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले असता पुढील तपासासाठी वन कोठडी सुनावण्यात आली आहे.
या कारवाईत वनपाल भुजबळ, वनपाल कपोते, वनरक्षक रूपवते, वनरक्षक आहेर, वनरक्षक कांगणे तसेच रोहित खंडागळे व निखिल वैद्य यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. वन्यजीव संरक्षणासाठी करण्यात आलेल्या या कारवाईचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.






















