शिरपूर धुळे:(प्रतिनिधी तुषार शेटे) ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना सैन्य, पोलीस व इतर सुरक्षा दलांमध्ये करिअर घडविण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने किसान विद्या प्रसारक संस्था, शिरपूर यांच्या वतीने “कर्मवीर सैनिकी भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र” याची नवीन शाखा बोराडी येथे सुरू करण्यात आली आहे.

या केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सैनिकी भरती, पोलीस भरती, विविध सुरक्षा दलांतील भरती तसेच इतर स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारे सर्वांगीण मार्गदर्शन पूर्णतः मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहे. विशेषतः आदिवासी विभागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण प्रशिक्षणाची संधी त्यांच्या परिसरातच मिळणार असल्याने या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होत आहे. प्रशिक्षणामध्ये शारीरिक प्रशिक्षण, व्यायाम व फिटनेस, लेखी परीक्षेचे मार्गदर्शन, योग व ध्यान प्रशिक्षण, सैनिकी प्रशिक्षणाची प्राथमिक माहिती, वैज्ञानिक आहार व तपासणी तसेच अनुभवी प्रशिक्षकांचे मार्गदर्शन अशा विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक व बौद्धिक विकासावर भर देत त्यांना भरती प्रक्रियेसाठी सक्षम बनविण्याचा केंद्राचा उद्देश आहे.
या उपक्रमामुळे ग्रामीण व दुर्गम भागातील अनेक होतकरू युवक-युवतींना मोठ्या शहरांमध्ये जाऊन प्रशिक्षण घेण्याची गरज भासणार नाही. स्थानिक पातळीवर दर्जेदार प्रशिक्षण मिळाल्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांनाही सैनिकी व पोलीस भरतीची स्वप्ने साकार करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
संस्थेच्या वतीने इच्छुक विद्यार्थ्यांना लवकरात लवकर प्रवेश नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रवेश मर्यादित असल्याने इच्छुकांनी तातडीने संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
संपर्क क्रमांक :
९०४९६५५३९२, ७५५८५७९६४४,
९०७५८२५७०४,९७६७७ १३३२५, ९४०५४४२८२५, ७६२००८२०२५
“चला, देशसेवेच्या स्वप्नाला देऊया नवा उंच वेग!” या प्रेरणादायी घोषवाक्यासह संस्थेने अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.






















