Times of Maharashtra Desk, Jalgaon: जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तालुक्यातील मानेगाव शिवारात केळीच्या बागेत लपवून केलेली गांजाची अवैध शेती पोलिसांनी उध्वस्त केली आहे. या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखा आणि मुक्ताईनगर पोलिसांनी तब्बल ३ क्विंटल ४१ किलो गांजा जप्त केला असून, त्याची बाजारातील किंमत अंदाजे २३ लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.
नेमकी घटना काय?
पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की, मुक्ताईनगर तालुक्यातील मानेगाव शिवारात एका शेतकऱ्याने आपल्या केळीच्या बागेत आंतरपीक म्हणून गांजाची लागवड केली आहे. या माहितीच्या आधारे जळगाव स्थानिक गुन्हे शाखा आणि मुक्ताईनगर पोलिसांच्या संयुक्त पथकाने संबंधित शेतावर छापा टाकला.
पोलिसांनी जेव्हा पाहणी केली, तेव्हा केळीच्या झाडांच्या आडोशाला बेकायदेशीररित्या लावलेली गांजाची झाडे आढळून आली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत ही सर्व झाडे उपटून नष्ट केली आणि मुद्देमाल जप्त केला. संशयित शेतकऱ्याला अटक करण्यात आली असून, मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध धंदे चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि मुक्ताईनगर पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पुढील तपास मुक्ताईनगर पोलीस करत आहेत.






















