Times of Maharashtra Desk : पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकांसाठी (PMC & PCMC Election 2026) मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना, शहरात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अजित पवार आणि भाजप यांच्यातील प्रतिष्ठेच्या लढाईत आता मतदारांना आकर्षित करण्यासाठी वस्तूंच्या वाटपाचे धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. पुण्यात चांदीच्या वाट्या तर पिंपरीत थेट वॉशिंग मशीन जप्त करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
कात्रजमध्ये ‘चांदीच्या वाट्या’ वाटल्याचा आरोप
वसंत मोरेंचा खळबळजनक दावा पुण्यातील कात्रज परिसर (प्रभाग क्र. ४० ड) सध्या या निवडणुकीच्या केंद्रस्थानी आहे. येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते वसंत मोरे यांचे पुत्र रुपेश मोरे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. वसंत मोरे यांनी आरोप केला आहे की, या प्रभागात मतदारांना आकर्षित करण्यासाठी चक्क ‘चांदीच्या वाट्या’ वाटल्या जात आहेत.
नेमकी घटना काय?
बुधवारी संध्याकाळी एका संशयास्पद गाडीतून चांदीच्या वाट्यांची वाहतूक होत असल्याचा दावा मोरे यांनी केला.पकडण्यात आलेल्या गाडीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रकाश कदम यांच्या प्रचाराचे साहित्य आणि मतदार याद्या आढळून आल्याचा आरोप देखील मोरे यांनी केला आहे.या प्रकरणी वसंत मोरे यांनी तात्काळ पोलिसांत धाव घेऊन अधिकृत तक्रार दाखल केली असून, पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
पिंपरी-चिंचवडमध्ये कारवाई
‘वॉशिंग मशीन’ने भरलेला ट्रक जप्त इकडे पुण्यालगतच्या पिंपरी-चिंचवडमध्येही भरारी पथकाने मोठी कारवाई केली आहे. रहाटणी येथील गणराज कॉलनी परिसरात मतदारांना वाटण्यासाठी आणलेल्या वॉशिंग मशीनचा साठा निवडणूक अधिकाऱ्यांनी जप्त केला आहे.१२ जानेवारीच्या रात्री उशिरा निवडणूक आयोगाच्या आचारसंहिता कक्षाला वॉशिंग मशीन वाटपाची गुप्त माहिती मिळाली. त्यानंतर ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयाचे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार आणि एफ.एस.टी. पथकाचे प्रमुख राहुल निकम यांनी तातडीने धाव घेतली. घटनास्थळी एमएच १४ केए ६३३० (MH 14 KA 6330) या क्रमांकाच्या गाडीतून १९ वॉशिंग मशीन जप्त करण्यात आल्या आहेत.
निवडणूक आयोगाचे ‘डोळ्यात तेल घालून’ लक्ष मतदानाच्या काही तास आधीच घडलेल्या या दोन्ही प्रकारांमुळे निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिस आणि निवडणूक आयोग अधिक सतर्क झाले असून, अशा प्रकारच्या गैरव्यवहारांवर कडक कारवाई करण्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत. आता या प्रकरणांमध्ये पुढे काय कारवाई होते, याकडे संपूर्ण पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांचे लक्ष लागले आहे.






















