विनोद पवार ( जळगाव प्रतिनिधी ) : जळगाव जिल्हा पोलीस दलामार्फत सुरू असलेल्या पोलीस शिपाई भरती प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा असलेली लेखी परीक्षा रविवारी (१५ मार्च २०२६) शांततेत आणि पारदर्शक वातावरणात यशस्वीरित्या पार पडली. कडक पोलीस बंदोबस्त, काटेकोर नियोजन आणि शिस्तबद्ध व्यवस्थेमुळे ही परीक्षा सुरळीत पार पडल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील एकूण १७९ रिक्त पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यापूर्वी पार पडलेल्या मैदानी चाचणीत पात्र ठरलेल्या २,०९६ उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी बोलाविण्यात आले होते. जळगाव येथील एम. जे. कॉलेज या परीक्षा केंद्रावर सकाळी ११.०० ते दुपारी १२.३० या वेळेत परीक्षा घेण्यात आली.
या परीक्षेला उमेदवारांचा मोठा प्रतिसाद मिळाला. एकूण २,०९६ पात्र उमेदवारांपैकी २,०४० उमेदवारांनी प्रत्यक्ष परीक्षेला हजेरी लावली, तर ५६ उमेदवार गैरहजर राहिले. त्यामुळे उपस्थितीचे प्रमाण ९७.३३ टक्के इतके नोंदविण्यात आले आहे.
परीक्षा प्रक्रियेदरम्यान कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी केंद्र परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. प्रवेशद्वारावर उमेदवारांची तपासणी, ओळखपत्र पडताळणी तसेच परीक्षा हॉलमध्ये काटेकोर देखरेख ठेवण्यात आली होती. त्यामुळे संपूर्ण परीक्षा प्रक्रिया शांततेत आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडली.
ही संपूर्ण प्रक्रिया पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. परीक्षा कालावधीत कोणतीही अनुचित घटना घडली नसल्याची माहिती प्रशासनाने दिली.
दरम्यान, लेखी परीक्षेचा निकाल आणि अंतिम निवड यादी लवकरच जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. भरती प्रक्रिया पूर्णपणे गुणवत्ता आणि पारदर्शकतेवर आधारित असल्याने उमेदवारांनी कोणत्याही अफवा किंवा आमिषांना बळी पडू नये, असे आवाहनही जिल्हा पोलीस प्रशासनाने केले आहे.






















