Times of Maharashtra Desk : पुणे महानगरपालिका निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात मोठा घडामोडीला वेग आला असून, अजित पवार गट आणि शरद पवार गटातील राष्ट्रवादी काँग्रेस अखेर एकत्र येण्यावर शिक्कामोर्तब झाला आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीनंतर आता पुण्यातही दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या गुप्त बैठका, गाठीभेटी आणि अंतर्गत चर्चांनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी जागावाटप आणि इतर कारणांमुळे प्रस्तावित युती फिस्कटल्याची चर्चा होती. मात्र, आता पुणे महापालिकेसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र मैदानात उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी पुण्यातील अनौपचारिक चर्चांमध्ये महत्त्वाचे वक्तव्य करत, पुणे महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीची थेट लढाई भाजपविरोधात असणार असल्याचे स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे राज्यात महायुतीसोबत असलेले अजित पवार पुण्यात मात्र मित्रपक्ष भाजपविरोधात निवडणूक लढवणार असल्याने राजकीय समीकरणे बदलताना दिसत आहेत.
दरम्यान, पुणे महापालिका निवडणुकीसाठी अजित पवारांकडून जोरदार तयारी सुरू असून, याच पार्श्वभूमीवर आज शुक्रवार, 2 जानेवारी रोजी पिंपरी-चिंचवड येथे अजित पवार यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेत अजित पवार मागील कारभारावर भाष्य करणार असून, पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कथित भ्रष्टाचाराविरोधात हल्लाबोल करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या पत्रकार परिषदेत अजित पवार भाजपवर नेमके काय आरोप करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पुण्यातील जागावाटपाबाबत बोलायचे झाल्यास, सुमारे 40 जागांवर शरद पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस ‘तुतारी’ चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याची माहिती आहे. दुसरीकडे भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना पुण्यात स्वबळावर निवडणूक लढवणार आहेत. काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटाची शिवसेना एकत्र निवडणूक लढवणार असून, उद्धवसेना आणि मनसेमध्येही युती झाली आहे. उद्धव ठाकरे गटाच्या वाट्याला आलेल्या काही जागांवर मनसे उमेदवार उभे राहणार आहेत.
भाजप आणि शिंदे गटाची युती न झाल्याने पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत चौरंगी लढत होण्याची शक्यता असून, ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.






















