सेवानगर तांडा (पाथर्डी) : जि. प. प्राथमिक शाळा सेवानगर तांडा येथे २६ जानेवारी रोजी भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, राष्ट्रीय एकात्मता व भारतीय संविधानाविषयी आदर निर्माण करण्याचा उद्देश साध्य करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात शाळेतील विद्यार्थ्यांच्या प्रभात फेरीने करण्यात आली. हातात तिरंगा ध्वज घेत विद्यार्थ्यांनी जय जवान, जय किसान, भारत माता की जय, वंदे मातरम अशा देशभक्तीपर घोषणा देत परिसरात जनजागृती केली. प्रभात फेरीमुळे संपूर्ण गावात राष्ट्रप्रेमाचे वातावरण निर्माण झाले होते.

यानंतर शाळेच्या प्रांगणात आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी देशातील विविध प्रांतांचे प्रतिनिधित्व करणारी पारंपरिक नृत्ये सादर केली. या सादरीकरणातून भारताची सांस्कृतिक विविधता आणि एकात्मतेचे दर्शन घडले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.
या प्रसंगी मुख्याध्यापक गोल्हार सर, दादा दौंड सर, झिरपे मॅडम, युवा उद्योजक अनिल वरुंगुळे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच आसाराम चव्हाण, बबन राठोड, गोरक्ष राठोड, प्रवीण जाधव, नवनाथ माळी, शिवाजी राठोड, पेमा राठोड, भाऊसाहेब वरुंगुळे, प्रकाश चव्हाण, विकास राठोड आदी पालक व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांनी आपल्या मनोगतातून प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व स्पष्ट करत संविधानाने दिलेल्या हक्कांबरोबरच कर्तव्यांची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दौंड सर तर नियोजन गोल्हार सर यांनी केले . कार्यक्रम शांततापूर्ण व शिस्तबद्ध वातावरणात पार पडला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, सामाजिक जाणीव आणि राष्ट्रीय मूल्यांची रुजवणूक होण्यास मदत झाली, अशी प्रतिक्रिया गावकऱ्यानी व्यक्त केली.






















