Times Of Maharashtra : महाराष्ट्राच्या राजकारणाला गेली अडीच वर्षे चर्चेत राहिलेला शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावरील वाद आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. या प्रकरणावर आज, 21 जानेवारी रोजी सुनावणी होणे अपेक्षित होते मात्र आता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी, 23 जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणावर अंतिम युक्तिवाद होणार आहे. या सुनावणीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जोयमाल्य बागची यांच्या खंडपीठासमोर हे प्रकरण अंतिम युक्तिवादासाठी येणार आहे. याआधी नोव्हेंबर 2025 मध्ये न्यायालयाने हे प्रकरण बराच काळ प्रलंबित असल्याची नोंद घेत तातडीने सुनावणीची आवश्यकता व्यक्त केली होती.
जून 2022 मधील फूट व सत्तांतर
या संपूर्ण वादाची सुरुवात जून 2022 मध्ये झाली. शिवसेनेतील वरिष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह बंड पुकारत भाजपसोबत युती केली. या राजकीय घडामोडींमुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार कोसळले आणि राज्यात नवे सत्तासमीकरण अस्तित्वात आले. शिंदे गटाचा दावा होता की, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबतची युती शिवसेनेच्या मूळ हिंदुत्ववादी विचारधारेपासून दूर जाणारी होती.
निवडणूक आयोगाचा निर्णय
फेब्रुवारी 2023 मध्ये निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या गटाला ‘खरी शिवसेना’ म्हणून मान्यता देत धनुष्यबाण हे अधिकृत चिन्ह बहाल केले. हा निर्णय प्रामुख्याने विधिमंडळातील संख्याबळाच्या आधारे घेण्यात आल्याचे आयोगाने स्पष्ट केले होते. त्यानंतर 2024 मधील लोकसभा आणि विधानसभा निवडणुका शिंदे गटाने शिवसेना या नावाने आणि धनुष्यबाण या चिन्हावर लढवल्या.
उद्धव ठाकरे यांची सर्वोच्च न्यायालयात धाव
निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. आमदार अपात्रतेचा मुद्दा प्रलंबित असताना केवळ संख्याबळाच्या आधारावर निर्णय घेणे चुकीचे असल्याचा युक्तिवाद ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. पक्षाची संघटनात्मक रचना, पक्षप्रमुखपद आणि प्रमुख पदांवर आपलेच नियंत्रण असल्याचेही न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे.
यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास नकार दिला होता. त्यामुळे शिंदे गटाकडे शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह कायम राहिले, तर उद्धव ठाकरे गटाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
आणि ‘मशाल’ हे चिन्ह वापरावे लागले.
चिन्ह आणि वारशाची लढाई
हा वाद केवळ निवडणुक चिन्हापुरता मर्यादित नसून, बाळासाहेब ठाकरे यांच्या खऱ्या राजकीय वारशाचा मुद्दा यामागे केंद्रस्थानी आहे. शिवसेना ही केवळ राजकीय पक्ष नसून, ती लाखो शिवसैनिकांची भावनिक ओळख आहे. ही ओळख कोणाच्या हाती राहते, यावर महाराष्ट्राच्या भविष्यातील राजकारणाची दिशा ठरणार आहे.23 जानेवारी या तारखेकडे
संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले






















