देवा आत्राम मारेगाव प्रतिनिधी : जिल्हा क्रीडा संकुल समितीअंतर्गत आझाद मैदान येथे सुरू असलेल्या जलतरण तलाव व संबंधित विकासकामांची जिल्हाधिकारी विकास मीना यांनी शुक्रवारी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी सुरू असलेल्या कामांचा आढावा घेत कामांच्या गतीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. ठरवून दिलेल्या कालमर्यादेत कामे पूर्ण न झाल्यास संबंधित कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.
आझाद मैदान येथील जलतरण तलाव, कॅपिटेरिया तसेच संकुलातील इतर पूरक सुविधांची पाहणी करताना जिल्हाधिकाऱ्यांनी कामाच्या दर्जाबाबत व प्रगतीबाबत सविस्तर माहिती घेतली. विशेषतः कॅपिटेरिया बांधकामाची गती अत्यंत संथ असल्याचे निदर्शनास आणून देत त्यांनी संबंधित कंत्राटदारांना काम वेगाने पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले.

पाहणीदरम्यान जिल्हा क्रीडा संकुल समितीच्या सचिव तथा जिल्हा क्रीडा अधिकारी शिल्पा चाबुसकवार, क्रीडा अधिकारी महेश पडोळे, शमहेश पडोळे, सचिन हरणे, मनीष डोळसकर, संकुलातील कर्मचारी तसेच जलतरण तलाव व कॅपिटेरिया बांधकामाचे कंत्राटदार उपस्थित होते.
जिल्हाधिकारी विकास मीना यांनी कामाच्या दर्जाबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे स्पष्ट करत, वेळेवर आणि गुणवत्तापूर्ण काम पूर्ण करणे ही कंत्राटदारांची जबाबदारी असल्याचे ठणकावून सांगितले. तसेच कामात येणाऱ्या तांत्रिक अडचणी असल्यास प्रशासन सकारात्मक भूमिका घेत आवश्यक ते सहकार्य करेल, मात्र विलंब खपवून घेतला जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, सदर विकासकामांची सद्यस्थिती, आतापर्यंत झालेली प्रगती तसेच आगामी नियोजनाबाबत जिल्हा क्रीडा संकुल समितीच्या सचिव तथा जिल्हा क्रीडा अधिकारी शिल्पा चाबुसकवार व क्रीडा अधिकारी महेश पडोळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सविस्तर माहिती दिली.
जलतरण तलाव व क्रीडा संकुलाची कामे वेळेत पूर्ण झाल्यास जिल्ह्यातील खेळाडूंना आधुनिक सुविधा उपलब्ध होणार असून, यवतमाळच्या क्रीडा क्षेत्राच्या विकासाला चालना मिळणार आहे. त्यामुळे प्रशासनाने या कामांकडे गांभीर्याने लक्ष दिल्याचे चित्र पाहणीदरम्यान दिसून आले.






















