विष्णु गायकवाड ( गेवराई प्रतिनिधी ) : धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी तसेच महाराजा सुभेदार मल्हारराव होळकर यांची जयंती मुंबईत साजरी करण्याच्या पार्श्वभूमीवर १६ मार्च रोजी ‘चलो मुंबई, आझाद मैदान’ या मुक्ती संग्राम आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या आंदोलनासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने धनगर समाज बांधव मुंबईत दाखल होणार असल्याने याबाबत आज मुंबई येथील विधानभवनात महत्त्वपूर्ण चर्चा पार पडली. यावेळी आंदोलक मल्हार योद्धे दीपक भाऊ बोराडे यांना राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी चर्चेसाठी निमंत्रित केले होते. विधानभवन येथे झालेल्या या चर्चेत धनगर समाजाच्या एसटी आरक्षणासंदर्भातील विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
समाजाच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचविण्यात आल्या असून या संदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
दरम्यान, १६ मार्च रोजी मुंबईतील आझाद मैदान येथे धनगर समाजाचा मोठा मेळावा व आंदोलन होणार असून त्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. या दिवशी महाराजा सुभेदार मल्हारराव होळकर यांची जयंतीही उत्साहात साजरी करण्यात येणार आहे.
या चर्चेदरम्यान दिपक बोऱ्हाडे , अँड.गणेश कोल्हे,सुरेश कांबळे, विजय तमनर, महादेव अर्जुन, सरपंच प्रल्हाद नेमाने,
श्याम बोराडे, अनंत बनसोडे, अमर वाघमोडे, मोहन देवकते यांच्यासह समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते. धनगर समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर लवकरात लवकर सकारात्मक तोडगा निघावा, अशी अपेक्षा समाजबांधवांकडून व्यक्त केली जात आहे.






















