प्रवीण चौधरी (परभणी प्रतिनिधी): पूर्णा शहरातील नांदेड रोडवरील मदरसा जामिया हजरत हस्सान बिन साबित येथे मंगळवारी (३ फेब्रुवारी) पाचवा वर्धापन दिन धार्मिक, शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध उलेमा कारी रशीद हमीदी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात नमाज पठण आणि सामूहिक दुवाने करण्यात आली. यावेळी मदरशातील विद्यार्थ्यांनी कुरआन पठण व धार्मिक सादरीकरणातून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. गुणवंत विद्यार्थ्यांना रोख रक्कम व शैक्षणिक साहित्य देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी बोलताना सांगितले की, धार्मिक शिक्षणासोबतच चांगले संस्कार, शिस्त आणि नैतिक मूल्यांची जोपासना होणे अत्यंत आवश्यक आहे. मदरसा जामिया हजरत हस्सान बिन साबित गेल्या पाच वर्षांपासून धार्मिक शिक्षणाबरोबरच शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून समाजात सकारात्मक परिवर्तन घडवत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमास विविध मान्यवर उलेमा, पालक, मदरशाचे विद्यार्थी तसेच शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचा समारोप सामूहिक दुवा व आभार प्रदर्शनाने करण्यात आला.






















