Times Of Maharashtra Desk : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी महाराष्ट्रातील मराठी विरुद्ध अमराठी वादाला स्थानिक आजार असे संबोधल्याने राज्याच्या राजकारणात तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. या वक्तव्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर थेट निशाणा साधला आहे.
मुंबईत पार पडलेल्या संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना मोहन भागवत यांनी भाषेच्या आधारावर भेदभाव होत नसल्याचे सांगत, काही लोक हा मुद्दा मुद्दाम उकरून काढत असल्याचे मत व्यक्त केले होते. मात्र या विधानावर राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्टद्वारे संताप व्यक्त केला.
मराठी माणूस सहनशील आहे, मात्र महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांची कणा कमकुवत असल्यानेच अशा वक्तव्यांची हिंमत होते, असा आरोप राज ठाकरे यांनी केला. तसेच स्वतःला अराजकीय म्हणवून घेणाऱ्या संघाने अशा भाषिक वादात का पडावे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
भाषावार प्रांतरचना हा देशाच्या इतिहासाचा भाग असून, भाषा आणि प्रांतावरील प्रेम आजार ठरू शकत नाही, असे राज ठाकरे म्हणाले. मराठी भाषा आणि मराठी माणूस हेच आमचे सर्वोच्च प्राधान्य असून, मराठी अस्मितेवर आघात झाला तर महाराष्ट्र ठामपणे उभा राहील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.






















