Times Of Maharashtra Desk : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सातव्या दिवशी संसदेत अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला. 2004 नंतर पहिल्यांदाच पंतप्रधानांच्या भाषणाविना राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्ताव लोकसभेत आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आला. यामुळे संसदीय परंपरेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
लोकसभा सुरू होताच विरोधकांनी घोषणाबाजी सुरू केली. अवघ्या 65 सेकंदांतच सभागृह दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. नंतर दुपारी 12 वाजता कामकाज सुरू झाले, मात्र पाच मिनिटांतच पुन्हा दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब झाले. राहुल गांधींना बोलण्यापासून रोखल्याचा मुद्दा यावेळी केंद्रस्थानी होता.
राज्यसभेतही याचे तीव्र पडसाद उमटले. गदारोळानंतर विरोधी पक्षाच्या खासदारांनी राज्यसभेतून सभात्याग केला. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजूंनी राहुल गांधी नियम पाळत नसल्याचा आरोप केला, तर जेपी नड्डांनी काँग्रेसवर टीकेची झोड उठवली.
दरम्यान, काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी वाड्रा यांनी थेट सवाल केला राहुल गांधींना बोलू द्यायला ते का घाबरतात? सरकार शेतकऱ्यांशी संबंधित करार लपवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
या पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट ओपन चॅलेंज दिले आहे. चीन आणि कैलास रिज संदर्भातील गंभीर आरोप करत राहुल म्हणाले, पंतप्रधान सभागृहात आले, तर मी स्वतः जाऊन माजी लष्करप्रमुखांच्या पुस्तकाची प्रत त्यांच्या हातात देईन.






















