देऊळगाव राजा (प्रतिनिधी बबनराव नागरे) : जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा सावखेड भोई येथे समाजाच्या सहभागातून शाळेच्या विकासाला हातभार लागल्याचे प्रेरणादायी उदाहरण समोर आले आहे.
आज, दि. ९ एप्रिल २०२६ रोजी शाळेचे माजी विद्यार्थी व माजी शिक्षक श्री. रवींद्र मुळे यांनी सामाजिक उत्तरदायित्व जपत शाळेतील विद्यार्थ्यांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी २५,००० रुपयांची नगदी मदत दिली. या निधीतून उच्च दर्जाचा वॉटर फिल्टर प्लांट उभारण्यात येणार आहे.
पूर्वी शाळेत स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना पाणी पिण्यासाठी घरी जावे लागत होते. ही अडचण लक्षात घेऊन श्री. मुळे यांनी पुढाकार घेत गोरगरीब विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी मिळावे यासाठी ही मदत दिली.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष टेकाळे यांनी त्यांचे स्वागत केले. मुख्याध्यापक मुंदानकर सर यांनी आभार मानले तसेच शाळेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षक उपस्थित होते.
समाजातील व्यक्तींच्या अशा योगदानामुळे शाळेच्या विकासाला नवी दिशा मिळत असल्याचे यावेळी उपस्थितांनी नमूद केले.






















